

Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील २६.३४ लाख अपात्र लाभार्थ्यांना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यापासून स्थगिती देण्यात आली. दरम्यान, महिला आणि बालकल्याण खात्याकडून माहिती आणि तंत्रज्ञान खात्याला पाठवलेल्या २६ लाख लाभार्थ्यांच्या डेटाची पडताळणी करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील १५ दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे.
२६ लाख खात्यांच्या माहितीमध्ये काही महिलांचे खाते नसल्यामुळे कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती जोडली असल्याची बाब समोर आली आहे. अशा महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे. पण ज्या बोगस खात्यांची माहिती समोर येईल; त्यांच्याकडून ११ महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार आहेत. तसेच गुन्हेदेखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
महिला आणि बालकल्याण खात्याकडून बोगस खातेधारकांकडून ११ महिन्यांचे १६ हजार ५०० रुपये वसूल करण्यात येणार असल्याचे समजते.
लाडकी बहीण योजनेतील २६.३४ लाख अपात्र लाभार्थ्यांपैकी काहीजण एकापेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत असल्याचे नुकतेच समोर आले. तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असून काही ठिकाणी पुरुषांनीही अर्ज केल्याचे आढळून आले आहे. या सर्व अपात्र लाभार्थींना जूनपासून योजनेचा लाभ घेण्यास स्थगिती दिली आहे, असे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.
या योजनेतर्गंत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली. यातील लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत. तर काही कुटुंबामध्ये १ पेक्षा जास्त लाभार्थी आहेत. तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.