कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा येथील मोहरम सणाचा कुदळ विधी बुधवारी 19 तारखेला होऊन मोहरम सणाला प्रारंभ होणार आहे, तर शुक्रवारी 28 तारखेला खत्तलविधी तर 29 तारखेला ताबूत विसर्जन करून मोहरम संपन्न होणार आहे. 10 दिवसांच्या कालावधीत समस्त बहुजन समाज बांधवांनी भक्तिमय वातावरणात मोहरम सण साजरा करावा असे आवाहन मुस्लिम सेंट्रल कमिटीचे अध्यक्ष मिरासाहेब पाथरवट, शकील गरगरे यांनी केले. येथील बैरागदार मशिद येथे मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहर पीर पंजा कमिटीच्यावतीने शनिवारी सायंकाळी 7 वाजता बैठक संपन्न झाली.
यावेळी बुधवारी कुदळविधी संपन्न झाल्यानंतर रविवार आणि सोमवारी 23 आणि 24 तारखेला नालविधि आणि पीर पंजा प्रतिष्ठापना होणार आहे. बुधवार आणि गुरुवारी 26 व 27 तारखेला सातवी आठवी भेटीचा कार्यक्रम रात्री संपन्न होणार आहे. शुक्रवारी 28 तारखेला खत्तल विधी व खाई-फोडणी कार्यक्रम होणार आहे. तर 29 तारखेला रविवारी रात्री उशिरापर्यंत पीर पंजा विसर्जन होणार आहे. भेटी दिवशी हजरत दौलतशहावली दर्गाहच्या पुढे फटाके उडवण्यास बंदी करण्यात आली आहे. तर खत्तल दिवशी खाई विधी दरम्यान दक्षतापूर्वक विधी पार पाडावे. यासह आदी विषयांवर चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून पालिका प्रशासन, वीज वितरण कंपनी आणि पोलीस प्रशासनाने मोहरम सण साजरा करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व मोहरम शांततेत व व्यवस्थितरित्या पार पडावे यासाठी त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार गरगरे यांनी मानले.
यावेळी माजी नगराध्यक्ष फारूख जमादार, शब्बीर भिलवडे, मेहबूब मोमीन, बशीर आबी, दस्तगीर बारगीर, जावेद बागवान, अजित पाटील, जहाँगीर जमादार, बुशरान खाटीक, मजीद गोदड यांच्यासह मोहरम कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा :