कोल्हापूर : विशाळगड, पावनखिंडीला पर्यटकांची पसंती

कोल्हापूर : विशाळगड, पावनखिंडीला पर्यटकांची पसंती

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : विशाळगड, पावनखिंडीत आज (दि.९) सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. पर्यटकांनी परिसरातील विलोभनीय निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. काय ते डोंगर, काय ते निसर्गसौंदर्य, सगळं ओक्केच..! अशी प्रतिक्रिया पर्यटकांकडून व्यक्त होत होती.

सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे विशाळगड, पावनखिंड परिसर पर्यटकांनी गजबजलेल्या अवस्थेत होता. कुटुंबासह पर्यटक पर्यटनास बाहेर पडले आहेत. पर्यटक निसर्गरम्य ठिकाणांनाच अधिक पसंती देऊ लागले आहेत. निसर्गसमृद्ध आंबा गिरीस्थान, किल्ले विशाळगड आणि साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेल्या रणसंग्रामातील पावनखिंड ही ठिकाणे वर्षातील बाराही महिने पर्यटकांनी गजबजलेली असतात. ऐतिहासिक बाज असलेल्या पावनखिंडीविषयी तर पर्यटकांना खास आकर्षण वाटू लागले आहे. निसर्गाचा हा आविष्कार आणि जैवविविधतेचा नजराणा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले वळली आहेत.

आंबा, विशाळगडचे जंगल, जैवविविधता आणि उंच डोंगररांगा यामुळे हा भाग पश्चिम घाटाची ख्याती टिकवून आहे. बाराही महिने हिरवागार निसर्ग आणि थंड हवा यासाठी प्रसिद्ध असलेला आंबा आणि आंबा घाट पर्यटकांची नेहमीच तहानभूक हरवतो. हौशी पर्यटकांना आंबा-विशाळगड किंवा पावनखिंड-विशाळगड या मार्गावर ट्रेकिंगचाही अनुभव घेता येतो. नैसर्गिक वरदान लाभलेल्या या परिसरात राज्यप्राणी शेकरू, राज्यफुल जारुल, राज्यपक्षी हरेल व राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन यासह दुर्मिळ असलेला माउस डीअर (गेळा), रानगवे, हॉर्नबील, गरुड यासह औषधी वनस्पतींचा खजिना दृष्टीस पडतो. आंब्यातली देवराई, निसर्ग माहिती केंद्र, सासनकडा, मानोली धरण याचाही अनुभव घेता येतो.

थकूनभागून आलेल्या पर्यटकांसाठी इथली रिसोर्ट्स नेहमीच स्वागतासाठी सज्ज आहेत. कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, रानमेव्यांची सरबराई यामुळे पर्यटकांची चांगली सोय होते. आंबा घाट, वाघझरा, कोकण पॉईंट, पावनखिंड व किल्ले विशाळगड या मार्गावर जंगल सफारी करण्यासाठी आंबा येथे जीपवर टप केलेल्या खास गाड्याही सदैव सजलेल्या असतात.

पावनखिंड ते विशाळगड या तेरा किलोमीटरच्या मार्गावर निसर्गाची हिरवाई, दाट झाडी, वेडावाकडा घाट आहे. विशाळगडावर मुंढा दरवाजा, पंतप्रतिनिधी वाडा,  टकमक दरी, पावनखिंडित प्राणार्पण केलेल्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू या दोघा बंधूंच्या समाधी, हजारो फूट खोल दऱ्या, मलिक रेहान दर्गाह या साऱ्या गोष्टीसह अन्य ठिकाणे पर्यटकांना पहावयास मिळतात. मलकापूरपासून पांढरेपाणी, पावनखिंड, भाततळी, गजापूर, गेळवडे धरण, विशाळगड हा तीस किलोमीटरचा तर मलकापूरपासून आंबा ते विशाळगड हा वीस किलोमीटरचा परिसर पूर्णपणे निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. इथली दाट झाडी सदैव गारवाच देते. या मार्गावर भटकंती केल्यावर विविध जातीचे पक्षी व वन्य प्राण्यांचे हमखास दर्शन होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news