Kolhapur News | उदगावमध्ये अर्जुनवाड ग्रामस्थांचा उद्रेक; 'एटीपी' प्रकल्पाच्या पाईपलाईन्स जेसीबीने उखडल्या

चारही प्रोसेस युनिट्स कायमस्वरूपी बंद; संतापलेल्या ग्रामस्थांनी औद्योगिक वसाहतीला घातला घेराव
Udgaon ATP project protest
सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईप्स जेसीबीने उखडून टाकण्यात आल्या. Pudhari
Published on
Updated on

Udgaon ATP project protest

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित पाण्याचा प्रश्न अखेर स्फोटक वळणावर पोहोचला. मंगळवारी (दि.२४) सकाळी अर्जुनवाड येथील हजारो ग्रामस्थांनी औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयावर धडक देऊन संचालकांना धारेवर धरले. जोपर्यंत प्रोसेस युनिट्स कायमस्वरूपी बंद होत नाहीत आणि पाईपलाईन फोडली जात नाही, तोपर्यंत न उठण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर तणावपूर्ण वातावरणात दुपारी चारही प्रोसेस कंपन्यांचा वीजपुरवठा खंडित करून, सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईप्स जेसीबीने उखडून टाकण्यात आल्या. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच ग्रामस्थांनी जल्लोष करत आंदोलन मागे घेतले.

नेमकी घटना काय?

उदगाव औद्योगिक वसाहतीमधील प्रोसेस कंपन्यांचे प्रदूषित पाणी पाईपलाईनद्वारे चिंचवाड ओढ्यात आणि तेथून थेट कृष्णा नदीत मिसळत होते. याच ठिकाणी अर्जुनवाड गावाची पाणीपुरवठा योजना (जॅकवेल) असल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत होते. या गंभीर प्रश्नावर सोमवारी प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱ्यांना कोंडून घालण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता संपूर्ण अर्जुनवाड गाव बंद ठेवून ग्रामस्थ उदगावमध्ये एकवटले.

Udgaon ATP project protest
Kolhapur news | शिरढोणमध्ये मोराच्या शिकारीसाठी सापळे; शेतकरी जखमी

संचालकांना धरले धारेवर

औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी रौद्र रूप धारण केले होते. व्हा. चेअरमन मेघा पाटील, संचालक दिलीप पाटील-कोथळीकर, नितीन जाधव, सुधीर अकिवाटे यांच्यासह इतर संचालकांना दूषित पाण्याबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी मोठा गदारोळ झाला. "गेल्या ३५ वर्षांपासून कागदोपत्री खेळ सुरू आहे, आता ठोस कृती हवी," अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला झुकविले.

प्रमुख मागण्या आणि झालेली कारवाई:

  • कायमस्वरूपी बंदी: चारही प्रोसेस कंपन्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • विद्युत पुरवठा खंडित: कंपन्यांसह एटीपी (ATP) प्रकल्पाचा वीजपुरवठा तत्काळ तोडण्यात आला.

  • पाईपलाईन उध्वस्त: जेसीबीच्या सहाय्याने दूषित पाणी नेणाऱ्या सर्व पाईपलाईन्स उखडून टाकल्या.

  • परवाना रद्द: प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची लेखी शिफारस करण्यात आली.

Udgaon ATP project protest
Kolhapur News : नागदेववाडीत बंगला फोडला; दागिने, रोकड लंपास

"गावात ४०० कॅन्सरचे रुग्ण!" आंदोलनादरम्यान जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, धनाजी चुडमूंगे व इतर नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडली. "दूषित पाण्यामुळे गावात ४०० हून अधिक कॅन्सरचे रुग्ण आहेत, नागरिक जीव गमावत आहेत. आता आम्ही कोणत्याही आश्वासनाला बळी पडणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

आंदोलनाचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांनी फौजफाट्यासह धाव घेतली. तणाव वाढल्याने पोलिसांनी मध्यस्थी केली आणि संचालकांकडून लेखी पत्र मिळवून दिल्यानंतरच परिस्थिती नियंत्रणात आली.

या आंदोलनात अविनाश हेगण्णा, प्रकाश झांबरे, सीमा म्हैसाळे, दीप्ती जाधव, उज्वला पाटील, विश्वनाथ कदम, जितेंद्र म्हैसाळे, दर्शन चौगुले, भारती परीट, संतोष पाटील यांच्यासह अर्जुनवाडचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news