

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथील नांदणी रस्त्यालगत पिराप्पा मल्लाप्पा सोडगे यांच्या शेतात मोर व लांडोर पक्षीच्या शिकारीसाठी अज्ञाताकडून चार ठिकाणी सापळे लावल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या सापळ्यात शेतकरी सोडगे यांचा पाय अडकून ते किरकोळ जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
पोतदार पाणंद परिसरात मोर व लांडोर मोठ्या प्रमाणात आढळतात. या पार्श्वभूमीवर शिकारीच्या उद्देशाने सापळे लावण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी याबाबत कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना माहिती दिली. त्यांनी नागरिकांना या ठिकाणी संशयास्पद हालचाली आढळल्यास ११२ या क्रमांकावर तात्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे. तसेच वनविभागालाही घटनेची माहिती देऊन कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून त्याची शिकार करणे हा गंभीर गुन्हा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत मोरास संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. या कायद्यानुसार मोराची शिकार, पकडणे किंवा इजा करणे यासाठी दोषी आढळल्यास किमान तीन वर्षांपासून सात वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे. त्यामुळे अशा प्रकारांकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची गरजेचे आहे.