

हमिदवाडा: पुढारी वृत्तसेवा : सद्गुरू बाळूमामा यांचे मूळक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या कागल तालुक्यातील मेतके येथील श्री. हालसिद्धनाथ-बाळूमामा मंदिरात स्वतः मामानीच रोवलेला रणखांब श्रावण महिन्याच्या निमित्ताने महिनाभर दर्शनासाठी खुला करण्यात आला. आदमापूर बाळूमामा देवस्थानचे मुख्य प्रशासक शिवराज नाईकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रणखांबाची विधिवत पूजा व अभिषेक झाला.
स्वतः बाळूमामा यांनीच १९३२ मध्ये भक्तांची ईडा पिडा कमी व्हावी, या उद्देशाने हा १४ फूट उंचीचा रणखांब रोवल्याने याला भक्तांमध्ये वेगळे स्थान आहे. 'एक खांब कैलासात व दुसरा मेतक्यात..!' असे याबाबत बाळूमामा म्हणत. हा खांब खराब होवू नये, यासाठी सद्गुरू बाळूमामा ट्रस्टने त्याच्या सभोवती पंचधातूचे आवरण केले आहे. हेच आवरण काढून मूळ रणखांब भाविकांना दर्शनासाठी केवळ श्रावण महिन्यात म्हणजे तो १७ सप्टेंबरपर्यंत दर्शनासाठी खुला राहणार आहे.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आर.डी.पाटील,कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, सदस्य बाबासाहेब पाटील, पद्मजा तिबिले, दयानंद पाटील,बळीराम मगर,देवाप्पा पुजारी, मोहन पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा