कोल्हापूर: वाघापूर येथील नागपंचमी यात्रेची तयारी पूर्ण; प्रशासकीय यंत्रणा सज्ज | पुढारी

कोल्हापूर: वाघापूर येथील नागपंचमी यात्रेची तयारी पूर्ण; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथील ग्रामदैवत जोतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा सोमवारी (दि.२१) होत आहे. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती स्थानिक देवस्थान समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. (Waghapur Nagpanchami)

वाघापूर येथील ज्योतिर्लिंग देवस्थान हे नाग देवता म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. येथे दसरा सणाबरोबरच नागपंचमीला पश्चिम महाराष्ट्रातील मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातून लाखो भाविक येतात. नाग देवताचे आशीर्वाद घेत असतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याला मारू नका, वाचवा, अशा पद्धतीचा संदेश या देवस्थानच्या वतीने देण्यात येतो. निसर्ग संवर्धन काळाची गरज याप्रमाणे निसर्गाचे संवर्धन करण्याचा मौलिक संदेश येथून भक्तगण घेऊन जातात. सोमवारी पहाटे आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी आबिटकर यांच्या हस्ते अभिषेक, काकड आरती, पूजा होऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. (Waghapur Nagpanchami)

नागपंचमी यात्रेचे नियोजन स्थानिक देवस्थान समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येते. त्या अनुषंगाने गारगोटी पोलीस निरीक्षक, तहसीलदार, धर्मादाय कार्यालय, वीज वितरण कंपनी, एस टी महामंडळ पदाधिकार्‍यांना भेटून त्यांना निवेदन देऊन, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून यात्रेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावातील विविध पदाधिकारी, तरुण मंडळे यांच्या बैठका घेऊन यात्रा यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते यांची डागडुजी केली आहे. गावात स्वच्छता मोहीम राबविली आहे. या बैठकीस सरपंच बापूसो आरडे, बाळासाहेब शिंदे, धनाजी बरकाळे, सदाशिव दाभोळे, सोन्या आरडे, शिवाजी गुरव, लालू आरडे, बाळासो दाभोळे, सागर कांबळे, अनिल एकल, शिवाजी शिंदे, धनाजी एकल, मारूती सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

 Waghapur Nagpanchami : एकेरी वाहतूक व्यवस्था… एसटीच्या जादा फेरी…

भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यात्रेदिवशी आदमापूर- कूर- वाघापूर अशी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. गारगोटी, कागल, राधानगरी, गडहिंग्लज आगाराच्या वतीने जादा बस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनिमित्त ज्योतिर्लिंग सहज सेवा ट्रस्ट यांच्यावतीने मोफत अन्नछत्र तर अनेक तरुण मंडळाच्या वतीने खिचडी, चहा, दूध मोफत वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जाणार आहे. यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button