Kolhapur News : तोडीअभावी ऊस वाळला; शिरोळ तालुक्यातील शेतकरी हवालदिल

Kolhapur News : तोडीअभावी ऊस वाळला; शिरोळ तालुक्यातील शेतकरी हवालदिल


अब्दुल लाट : शिरोळ तालुक्यासह अब्दुललाट परिसरात तोडी अभावी उसाला तुरे सुटून ऊस वाळत आहे. त्यामुळे उसाच्या वजनात प्रचंड घट होऊ लागली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शिरोळ तालुक्यात ऊसतोड टोळ्या ऊसाला सुटलेला तुरा व वाळलेला ऊस पाहून खुशालीच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी करताना दिसत आहे. तर अनेक ठिकाणी टोळ्या पळून जात आहेत. Kolhapur News

अडचणीच्या ठिकाणी व काही ठिकाणी हव्या तेवढ्या रुंदी-लांबीच्या सरी नसल्याने ऊसतोडणी मशीन चालत नाहीत, मशीनची संख्या देखील कमी आहे. यामुळे ऊसतोडी पुढे जात असून हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे. साखर कारखाने देखील ऊस तोडणीसाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, यंत्रणा उभी करताना त्यांनाही नाकी नऊ येत असल्याचे चित्र आहे. साखर कारखान्यांकडून आलेल्या टोळ्या पळून जात असल्याने एका गावात प्रत्येक कारखान्यांचे एक किंवा दोनच टोळी असल्याचे दिसत आहे. मोठ्या शेती क्षेत्राच्या गावात अजून ५० टक्के ऊस शिल्लक दिसत आहे. Kolhapur News

आडसाली जाणारा ऊस सर्वच भागात अजूनही शिल्लक दिसत आहे, त्याचपद्धतीने इतरही उसाची परिस्थिती अशीच आहे. उन्हाच्या झळा वाढत असून कूपनलिका, विहिरी यातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे उसाला पाण्याची कमतरता भासत आहे. यातच तोडी पुढे जात असल्याने उसाला तुरे आले आहेत. वाढती उष्णता, उसाची खुंटलेली वाढ आणि उसाला आलेले तुरे यामुळे वजनात घट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला बँकेचे व सहकारी सोसायट्यांचे वाढते कर्ज, उसतोडीसाठी खुशाली खाली होणारी आर्थिक लूट आणि यातच काही ठिकाणी खाजगी सावकारांचा तगादा अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातात वेळेत पैसा येत नसल्याने पुढील पिकांचे नियोजन कोलमडले आहे.

पळून जात असलेल्या टोळ्या, अडचणीच्या ठिकाणी मशीन चालत नाही. यामुळे उसाला अजून तोडणी मिळत नाही. यामुळे डिसेंबर-जानेवारी महिन्यात जाणार ऊस अजून देखील शेतातच आहे. उसाला पाणी कमी पडत आहे. अनेक ठिकाणी उसाला तुरे फुटले आहेत. या गोष्टींचा परिणाम होऊन उसाचे वजन घटत आहे. यामुळे आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला आहे.

सचिन कुंभार – ऊस उत्पादक शेतकरी अ.लाट

ऊस तोडी वेळेत होत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत. सहकारी सोसायटी, बँका यांचे वाढते कर्ज यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे. यातच उसाला वेळेत तोड नसल्याने शेतकऱ्यांचे पाय आणखी खोलात रुतत आहेत. राज्य सरकार व कारखान्यांनी यावर तत्काळ तोडगा काढून यंत्रणा उभी केली पाहिजे.

रोहित गुरव – ऊस उत्पादक शेतकरी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news