कोल्हापूर : ठिकपुर्लीत कावीळचे 45 रुग्ण; 120 रुग्णांचे रक्त नमुने घेतले

कोल्हापूर : ठिकपुर्लीत कावीळचे 45 रुग्ण; 120 रुग्णांचे रक्त नमुने घेतले

तुरंबे; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्लीत काविळीचे 45 रुग्ण सापडले असून 120 नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले आहेत दरम्यान आठ दिवसांपासून गावात काविळीच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मंगळवारी मोठ्या संख्येने प्राथमिक आरोग्य केंद्रात काविळीचे संशयित रुग्ण उपचारासाठी आले होेते. त्यामुळे आरोग्य
यंत्रणा हडबडून गेली आहे. यामध्ये लहान मुलांचा सहभाग मोठा होता अनेकांच्या पोटात दुखत होते तर थंडी येऊन ताप येणे, उलटी, मळमळ अशी लक्षणे अनेक रुग्णांना होती. वाढती रुग्णसंख्या पाहून तहसीलदार अनिता देशमुख यांनी गावातील बाधित रुग्णांना भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सक्त सूचना दिल्या. घराघरात जाऊन बाधित रुग्ण शोधा, त्यांच्यावर उपचार करा आणि साथ रोग कमी आणण्यासाठी विशेष मोहीम राबवा, असे आदेश त्यांनी दिले. दरम्यान, सध्या गावात 45 कावीळ रुग्ण आहेत; तर 120 कावीळ संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासासाठी घेतले आहेत. बाधित 45 पैकी 28 रुग्ण ठिकपुर्ली येथील शासकीय रुग्णालयात तर 17 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सहा रुग्णांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.

यावेळी सरपंच प्रल्हाद पाटील म्हणाले, चार महिन्यांपूर्वी राज्य मार्गावरील गटारीतून पाणी वाहत नाही. यामुळे साचलेले मैलामिश्रित पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत आहे, अशी लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडे दिली आहे. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे कावीळ साथ गावात पसरली असल्याचा आरोप केला. आमदार प्रकाश आबिटकर यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या. मात्र त्यांनी गांभीर्याने घेतले नसल्याचा दावाही सरपंच पाटील यांनी केला.

आरोग्य यंत्रणा सतर्क

आरोग्य यंत्रणा आणि ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे गावांतर्गत पिण्याच्या पाईपलाईनची गळती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आमदार प्रकाश आबिटकर, अरुण जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर, जिल्हा साथ रोग वैद्यकीय अधिकारी संतोष तावसी, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्ये यांनीही गावाला भेट देऊन पाहणी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news