Shaktipeeth Highway : कोल्हापूरसह तुळजापूर, अंबेजोगाई, माहूर जोडणार शक्तिपीठ महामार्ग | पुढारी

Shaktipeeth Highway : कोल्हापूरसह तुळजापूर, अंबेजोगाई, माहूर जोडणार शक्तिपीठ महामार्ग

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी तसेच पर्यटनाच्या द़ृष्टीने मैलाचा दगड ठरणार्‍या शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा शक्तिपीठ मार्ग पत्रादेवी-बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) ते दिगरज (जि. वर्धा) असा एकूण 802 किलोमीटरचा आहे. हा मार्ग कोल्हापूरसह 12 जिल्ह्यांतून जाणार असून कोल्हापूरची श्री अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, अंबेजोगाईची श्री योगेश्वरी देवी आणि माहूरची श्री सप्तशृंगी देवी ही शक्तिपीठे जोडणारा महामार्ग राज्यात वेग घेणार आहे. या मार्गाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नागपूर ते गोवा हा सद्य:स्थितीला 21 तासांचा प्रवास आता फक्त 11 तासांत होणार आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून राज्यात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. याठिकाणी लाखो भाविकांची ये-जा असते. शिवाय अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते अरुंद व खराब असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती. यासाठी राज्य सरकारने धार्मिक स्थळांच्या विकासासाठी शक्तिपीठ महामार्ग उभारणीसाठी चाचपणी सुरू केली होती.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणीचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार पत्रादेवी ते वर्धा या महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता शासन निर्णय काढण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर, आदमापूर, कणेरी मठ, सांगवडे, पट्टणकोडोली, नृसिंहवाडी ही तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत.

Back to top button