कबनूर : पुढारी वृत्तसेवा : येथील कबनूर – रुई रोडवरील ओढ्यानजीक म्हसोबा मंदिरानजीक रस्त्यावर पडलेला मोठ्ठा खड्डा युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. हा रस्ता करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा. आणि मृत युवकाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी संतप्त युवकानी रविवारी (दि.२५) दुपारी अपघाताच्या ठिकाणी रास्ता रोको आंदाेलन केले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
कबनूरहून रुईकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुमारे ६ महिन्यापूर्वी झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे म्हसोबा मंदिरनजीक मोठी चर पडली आहे. त्यामुळे या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होतात. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास या ठिकाणी खड्डा चुकविण्याच्या नादात दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात आसिफ मुल्लानी (वय१९, रा. लक्ष्मीनगर) याचा जागीच मृत्यू झाला.तर दुसरा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.
निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच रस्त्यावर मोठी चर पडल्याने संबंधित कॉन्ट्रॅक्टर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत कारवाई न झाल्यास पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भिकाजी आपुगडे, तानाजी कोकणे, बादशहा यंबतनाळ, रोहित कांबळे, कृष्णात मगर, आदिनाथ कामगोंडा, असिफ मोमीन, रोहित पाटील, आण्णा मकोटे, महंमद मुजावर आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?