

Shiroli waste project relocation
शिरोली एमआयडीसी : शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक भवन शेजारी असलेला घन कचरा प्रकल्प पर्यायी जागेत स्थलांतर करा, अशा सुचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केल्या आहेत. मुंबई येथील उद्योग विकास आयुक्त कक्षामध्ये कोल्हापुरातील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडीअडचणी बाबत सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली.
बैठकीमध्ये शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (स्मॅक) वतीने अध्यक्ष राजू पाटील यांनी सभासद उद्योजकांच्या दोन अडचणी मांडल्या. यामध्ये स्मॅक शेजारील जागेत टाकला जाणारा पुलाची शिरोली ग्रामपंचायतीचा घनकचरा औद्योगिक क्षेत्रामध्ये दुर्गंधी पसरवत आहे. तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. माशा व भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही वाढल्याने कामगारांच्यात भीती निर्माण झाली आहे. तसेच ईएसआय अंतर्गत सुरू असणाऱ्या सेवा रुग्णालयासाठी शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये एक एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. या दोन्हीही मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मंत्री सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) च्या वतीने औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन दल व मूलभूत सुविधा केंद्रावरील दंड माफ करण्याची मागणी करण्यात आली. यापैकी अग्निशमन दलासाठी मंत्री उदय सामंत यांनी हिरवा कंदील दिला आहे. दंड माफीचा विषय हा संबंधित विभागाकडे ठेवून त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे आश्वासन देण्यात आले.
कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशनने उद्यमनगर येथे उद्योग वाढीसाठी व विस्तारासाठी जागा नसल्याने उपलब्ध जागेत पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर उद्योग सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे अंडरग्राउंड केबल आणि सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था सुधारण्यात यावी, अशी मागणी केली आहे. उद्यमनगर मधील रस्त्यांच्या दर्जाही सुधारण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सहमुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, उद्योग विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशावह, औद्योगिक विकास महामंडळाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता के. एस. भांडेकर, कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, उद्योजक बदाम पाटील, शेखर कुसाळे, सुनील शेळके, आदी उपस्थित होते.