

‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए...’ या उक्तीचा प्रत्यय कोल्हापूर-सांगलीकरांना कायम येतो आहे. मुंबई, पुण्यासह दिल्लीतल्या कुख्यात सायबर टोळ्यांकडून ऑनलाईन दरोड्याच्या घटना ताज्या असतानाच सांगली येथील द्राक्ष व्यापार्याला दिल्लीतल्या भामट्यांनी कोर्या कागदांची बंडले हातात ठेवून पाच, दहा नव्हे, तर तब्बल 50 लाखांना लुटले. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका डॉक्टरलाही अशाच पद्धतीने 45 लाखांचा गंडा घातला गेला. कुख्यात टोळ्यांकडून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक वयोवृद्धांसह व्यापारी, उद्योजक व्यावसायिकांना टार्गेट करून बेधडक लुटत असताना स्थानिक तपास ऑनलाईन लुटारू टोळ्यांचे आव्हान रोखणार का, हा सवाल आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे,कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात अलीकडच्या काळात सायबर भामट्यांसह जादा परतावा देण्याच्या आमिषाने सराईत टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. स्थानिक गुंड, एव्हाना एजंटांना परदेश वारी, आकर्षक कमिशन असे एक ना अनेक आमिषे दाखवून साखळी निर्माण केली जात आहे. या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचे फंडे सुरू झाले आहेत.
येथील निवृत्त प्राध्यापिका आणि रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरात (जामनगर) येथील निवृत्त वरिष्ठ अधिकार्यांना सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्टची भीती घालून त्यांच्याकडून ऑनलाईन कोट्यवधी रुपये उकळले. आयुष्यभर राब राब राबून जमविलेल्या पुंजीवर सायबर दरोडेखोरांनी कोट्यवधीचा डल्ला मारला आहे. या घटनांची पोलिस दप्तरी नोंद आहे. पाच-सहा महिन्यांपासून लुटमारीचा तपास सुरू आहे. मात्र अजूनही वयोवृद्धांना न्याय नाही. टोळ्यांचे म्होरके अजूनही तपास यंत्रणांच्या हाताला लागले नाहीत.
ऑनलाईन फसवणुकीच्या मालिका कायम असतानाच सांगली येथील द्राक्ष व्यापारी राजेश मुंदडा यांना दिल्लीस्थित राहुल नावाने ओळखल्या जाणार्या भामट्याने 50 लाख रुपयांचा नुकताच गंडा घातला आहे. पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल देण्याच्या बहाण्याने प्रत्यक्षात वर-खाली अशा प्रत्येकी दोन चलनी नोटा लावून आत कोरे कागद असलेली 10 बंडल देत व्यापार्याची फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेची शाहूपुरी पोलिसांची यंत्रणा तपास करीत आहे.
स्थानिक पोलिस, सायबर क्राईम यंत्रणेद्वारे झालेल्या फसवणुकीचा यथावकाश भांडाफोड होईल. पण दिल्ली स्थित भामट्याला सांगलीतील व्यापार्याच्या आर्थिक उलाढालीची इत्थंभूत कशी माहिती मिळू शकते, शिवाय त्यांचा मोबाईल क्रमांक, एवढेच नव्हे, व्यापार्याच्या दिल्ली येथील नातलगाचीही भामट्याला कशी माहिती होते, हा तपासाचा विषय आहे.
कोल्हापुरात दिल्ली स्थित भामट्यांशी संबंधित असलेले दोन अनोळखी तरुण सांगलीतील व्यापार्यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी कोर्या कागदांची दहा बंडले व्यापार्यांकडे सोपवून तेथून पसार झाले. हे तरुण कोण आणि त्यांच्या वास्तव्याचा ठावठिकाणा काय हा धागाही तपासात महत्त्वाचा ठरणारा आहे. शहरात सर्वत्र सीसीटिव्हीचे जाळे असताना संशयितांचे फुटेजही दिल्ली स्थित म्होरक्याचा बुरखा फाडणारे ठरणार आहे.
50 लाख मिळालेत, असा निरोप पोहोचल्यानंतर दिल्लीतील संबंधितांकडून भामट्याने 50 लाखांची रोकड ताब्यात घेतली. याचाच अर्थ भामट्याने पूर्वनियोजित कट करूनच व्यापार्यांची फसवणूक केल्याचा संशय आहे. फसवणुकीच्या कटात भामट्याने स्थानिक ‘पंटर’चाही वापर केल्याचा कयास आहे. शाहूपुरी पोलिस, सायबर क्राईम यंत्रणेद्वारे व्यापार्याला गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश करतील, यात शंका नाही. मात्र अशा भामट्या, फसव्या टोळ्यांना लोक बळी पडतात, फसतात याचेच आश्चर्य वाटते.