

Shirol Girl Rescues Snake
कवठेगुलंद : शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद माळभाग येथील मुख्य बाजारपेठेतील जिनेंद्र कृषी दुकानात अचानक विषारी साप शिरल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, सर्पमित्र काफिया महंमद कनवाडे हिने प्रसंगावधान राखत धाडसाने सापाला सुरक्षित पकडल्याने संभाव्य दुर्घटना टळली.
नेहमीप्रमाणे दुकानात ग्राहकांची वर्दळ सुरू असताना एका कोपऱ्यात साप असल्याचे निदर्शनास आले. अचानक साप दिसताच ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
याचवेळी उपस्थित असलेल्या काफिया कनवाडे हिने कोणतीही घाईगडबड न करता परिस्थितीचा ताबा घेतला. सापाला कोणतीही दुखापत होणार नाही आणि उपस्थित नागरिकांनाही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेत तिने कौशल्याने साप पकडला.
यानंतर सापाला सुरक्षितपणे प्लास्टिकच्या बरणीत ठेवून जवळील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तिच्या समयसूचकतेमुळे दुकानातील कर्मचारी, ग्राहक आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
काफिया कनवाडे हिच्या धाडस, प्रसंगावधान आणि वन्यजीवांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या या कामगिरीचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.