

Shirol Haroli Sugarcane Crop Damage
.शिरढोण: पंचगंगा नदीच्या कुशीत वसलेल्या हरोली (ता. शिरोळ) गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्याअभावी सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रातील ऊस पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी व कुपनलिकांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. परिणामी शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वळीव पावसानेही पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गावाचे एकूण शेती क्षेत्र ४७१ हेक्टर असून त्यापैकी ४४२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. ऊस हे प्रमुख पीक असून बहुतांश शेतकरी त्यावर अवलंबून आहेत. मात्र, सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. अनेक शेतातील ऊस पिवळसर पडून वाळू लागला आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या पाणीस्रोतांमधून अल्प प्रमाणात शेतीसाठी पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. वाढत्या खर्चामुळे शेतीचे अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतीला दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
गावातील विहिरी व कुपनलिकांची पाणीपातळी सातत्याने घटत असल्याने शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. वाढता खर्च, अपुरे पाणी आणि वाळणारी पिके यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. भाजी पाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तातडीने प्रभावी उपाययोजना केल्यास शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांना दिलासा मिळू शकतो.
- लक्ष्मण माने, शेतकरी