

शिरढोण : येथे माळ भागावरील कुमार विद्यामंदिर शाळेसमोर इचलकरंजी महानगरपालिकेच्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला रविवारी सकाळी अचानक मोठी गळती लागली. गळतीचे पाणी मोठ्या वेगाने बाहेर पडल्याने परिसरातील अनेक नागरिकांच्या घरासमोर, दारात तसेच शेतांमध्ये पाणी साचून नुकसान झाले. या घटनेमुळे इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला असून गळतीचे प्रमाण मोठे असल्याने मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.
मजरेवाडी येथील कृष्णा नदीवरील उपसा केंद्रातून बस्तवाड, शिरढोण व टाकवडे मार्गे इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा केला जातो. या मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. परिणामी शिरढोण व टाकवडे परिसरातील ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली असून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
गळतीमुळे लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात असून महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले. मात्र जलवाहिनीचे नुकसान गंभीर असल्याने दुरुस्तीसाठी अधिक वेळ लागणार असून मंगळवारपर्यंत इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.