

सातारा : कास धरणातून सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला आटाळी गावच्या शिवारात अनेक ठिकाणी गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाईपलाईनमधून तब्बल ७ ते ८ ठिकाणी पाण्याचे फवारे उडत असून हजारो लिटर पाणी ओढे-नाल्यांमध्ये वाहून जात आहे.
एकीकडे पाणीटंचाई आणि पाणी संवर्धनाबाबत जनजागृती केली जात असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या योजनेतूनच मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून गळतीची समस्या कायम असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस दुरुस्ती झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. गळतीमुळे परिसरातील शेतजमिनींमध्ये पाणी साचत असून काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे तातडीने दखल घेऊन गळती दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. कास-सातारा पाणीपुरवठा योजना ही शहरासाठी जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे पाण्याची होणारी नासाडी रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.