

Shahuwadi Panchayat Samiti Co-Opted Members Election
बांबवडे : शाहूवाडी पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया येत्या ४ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. पंचायत समितीमध्ये दोन्ही आघाड्यांचे समान संख्याबळ असल्याने जनसुराज्य आघाडी आणि शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या पदांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शाहूवाडी पंचायत समितीमध्ये एकूण आठ सदस्य आहेत. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत जनसुराज्य आघाडीचे चार, तर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे चार सदस्य निवडून आले होते. दोन्ही गटांचे संख्याबळ समान असल्याने पदाधिकारी निवडीवेळीही चुरस निर्माण झाली होती. त्यावेळी सभापतिपदी जनसुराज्य आघाडीच्या प्रियंका भोसले, तर उपसभापतिपदी अमर खोत यांची चिठ्ठीद्वारे निवड झाली होती.
आता स्वीकृत सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, दोन्ही आघाड्यांनी स्वतंत्र गटनोंदणी पूर्ण केली आहे. त्यामुळे प्रत्येकी एक जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आपल्या गटातून नेमकी कोणाला संधी द्यायची, यावरून दोन्ही बाजूंनी खलबते सुरू झाली आहेत.
जनसुराज्य आघाडीकडून नामदेव पाटील (पिशवी), अरुण पाटील (कोतोली) यांच्यासह काही इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. तर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीकडून भीमराव पाटील (सोंडोली) आणि सदाशिव पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
दोन्ही आघाड्यांना प्रत्येकी एक जागा मिळणार असली, तरी अंतिम उमेदवार निश्चित करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवड प्रक्रियेत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.