

सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या महायुतीमध्ये सत्तेच्या खुर्च्यांचे वाटप निश्चित झाले आहे. महापौरपदासाठी दहा महिने, एक वर्ष की सव्वा वर्ष असा सुरू असलेला सत्तेचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाची खांडोळी करू नका, अशी सक्त सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना केल्याने पाच वर्षांत पाच महापौर हे समीकरण निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार भाजपचे तीन, तर शिवसेनेचे दोन महापौर होणार असून, प्रत्येकाला एक वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने सत्तेच्या वाटपात सर्वाधिक पदे पदरात पाडून घेतली आहेत. दुसरीकडे अवघ्या चार जागा असलेल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला मात्र महापौरपद आलेले नाही.
महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेच्या पदांचे वाटप निश्चित झाले. मात्र, महापौरपदाचा कालावधी किती असावा, यावरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. दहा महिन्यांनी महापौर बदलायचा की सव्वा वर्षाचा कार्यकाळ द्यायचा, यावर खल सुरू होता. अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रत्येकी एक वर्षाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला. यामुळे भाजपचे तीन आणि शिवसेनेचे दोन महापौर शहराला मिळणार आहेत. राष्ट्रवादीला मात्र या सर्वोच्चपदापासून दूरच राहावे लागणार आहे.
मोठा भाऊ भाजपच...
महायुतीत सत्तेचे वाटप करताना भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महापौरपदाची तीन वर्षे, स्थायी समितीची तीन वर्षे आणि महत्त्वाच्या पदांवरही भाजपने पकड कायम ठेवली आहे. शिवसेनेला दोन वर्षांचे महापौरपद आणि स्थायी समितीची दोन वर्षे मिळाली. तर चार नगरसेवकांच्या राष्ट्रवादीला महापौरपदाची संधीच मिळाली नाही. परिवहन सभापतिपदही हातातून गेल्याने राष्ट्रवादीची अवस्था सत्तेत असूनही सत्तेबाहेर असल्यासारखी झाली आहे.
स्थायी सभापतिपदही एक वर्षाचेच
सध्या भाजपकडे महापौरपद असल्याने शिवसेनेच्या वाट्याला आलेले उपमहापौरपद जनसुराज्य शक्ती पक्षाला देण्यात आले आहे. मात्र, पुढील वर्षी शिवसेनेचा महापौर विराजमान झाल्यानंतर उपमहापौरपद भाजपकडे जाणार आहे. अशा प्रकारे भाजप आणि शिवसेनेत महापौर-उपमहापौरपदांची अदलाबदल होणार आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या वाटपातही भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पाच वर्षांपैकी तीन वर्षे सभापतिपद भाजपकडे, तर दोन वर्षे शिवसेनेकडे राहणार आहे. राष्ट्रवादीला सलग पाच वर्षे स्थायी समितीत एक जागा देण्याचे ठरले आहे. तसेच पाच वर्षे परिवहन समिती सभापतिपद देण्याचेही निश्चित झाले होते. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील गटनेत्यांच्या राजकारणात राष्ट्रवादीला परिवहन समिती सभापतिपदापासून वंचित राहावे लागले.
राष्ट्रवादीला सत्तेचे गाजर; पदांच्या वाटपात ठेंगा!
एकीकडे भाजप आणि शिवसेनेत महापौरपदासह महत्त्वाच्या पदांचे वाटप झाले असताना राष्ट्रवादीला मात्र सत्तेतील वाटा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अवघ्या चार नगरसेवकांच्या बळावर सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीची पदांच्या वाटपात पुरती कोंडी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्येही मोठा भाऊ आणि छोटा भाऊ हा फरक ठळकपणे समोर आला आहे. महापालिकेतील सत्तेची पाच वर्षे भाजप आणि शिवसेनेच्या महापौरांभोवती फिरणार असून, राष्ट्रवादीला सत्तेच्या सारीपाटावर नेमके काय मिळणार, हा प्रश्न कायम आहे.