

Salgar-Sadalga highway accident
कुरुंदवाड : सलगर–सदलगा महामार्गावरील तेरवाडजवळील दर्गाह परिसरात मंगळवारी (दि.१४) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. उत्तम नाना कांबळे (वय ५०, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) असे मृताचे नाव आहे. तर धनंजय कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी चारचाकी चालक खुर्शीद मेहबूब मुल्ला (वय ३८, रा. अफजलपूर, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा) याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास मुल्ला हा आपल्या ताब्यातील कार (क्र. KA23 N 7391) घेऊन कुरुंदवाडहून हेरवाडच्या दिशेने जात होता. त्याचवेळी उत्तम कांबळे व धनंजय कांबळे हे दुचाकी (क्र. MH09 AV 847) वरून हेरवाडकडे निघाले होते. तेरवाडजवळील दर्गाह परिसरात चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण धडकेत उत्तम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर धनंजय कांबळे गंभीर जखमी झाले.
जखमी धनंजय कांबळे यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, उत्तम कांबळे यांचा मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उत्तम कांबळे हे निवृत्त शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अब्दुललाट व हेरवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, सलगर–सदलगा महामार्गावर वारंवार अपघात होत असून हा सहावा अपघात आणि दुसरा बळी ठरला आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.