

पेठवडगाव : भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या तिहेरी भीषण अपघातातील गंभीर जखमी उदय अशोक जाधव (वय 34, रा. अंबप, ता. हातकणंगले) यांचा सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यापूर्वी त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाचा अपघातस्थळीच मृत्यू झाला होता. रविवारी सायंकाळी अपघात घडला होता.
विशाळगडहून मिरजकडे चाललेल्या गाडीने (केए 29-ए 6815) चालकाने मद्यधुंद अवस्थेत तळसंदे गावच्या वळणावर प्रथम एका दुचाकीला धडक दिली. यात मोहन बाबासाहेब शेटे (वय 55, रा. कुळरप, ता. वाळवा, जि. सांगली) व माधुरी अनिल बुड्डे (रा. पारगाव) जखमी झाले. यानंतर वाठारजवळ आमनापूर (ता. पलूस) येथून चावरे येथे निघालेल्या सुमोला धडक दिली. त्यानंतर काही अंतरावर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक देऊन चारचाकी रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन अडकली.
या धडकेत दुचाकीवरील उदय जाधव, त्यांची पत्नी प्रियांका, मुलगी कीर्तिका (वय 11) व मुलगा धैर्यशील रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये धैर्यशीलचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी उदय यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी प्रियांका व कीर्तिका यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू असून, इतर जखमींना कोडोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीचालक सदाशिव चिकय्या चिकन्नावरमठ (रा.सरवड, विजयपूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक भरत पाटील अधिक तपास करत आहेत.