Krishnat Khot : सरूड येथे ‘रिंगाणकार’ कृष्णात खोत यांचा नागरी सत्कार

Krishnat Khot : सरूड येथे ‘रिंगाणकार’ कृष्णात खोत यांचा नागरी सत्कार

सरूड : पुढारी वृत्तसेवा : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि त्यानंतर भारतमातेच्या संरक्षणात यत्किंचितही योगदान नसणारे आजघडीला देशात कट्टर धर्मवाद रुजविण्याच्या प्रयत्नात आहेत. मानवी जीवनाचे कल्याण उद्ध्वस्त करणारे हे धर्मवादाचे वादळ थोपविण्याची गरज आहे, ती ताकद साहित्यात आहे. असे प्रतिपादन माजी आ. बाबासाहेब पाटील-सरूडकर यांनी केले. Krishnat Khot

सरूड (ता. शाहूवाडी) येथे आयोजित साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक 'रिंगाणकार' कृष्णात खोत यांच्या भव्य नागरी सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जगाच्या इतिहासात अन्यायाविरुद्धच्या लढ्यात प्रत्येकवेळी साहित्यिकांनी रणशिंग फुंकले आहे. आताही समग्र लेखक, विचारवंतांनी धर्मवादाविरुद्ध बीजरोपण करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचवेळी शिक्षणरुपी रवीने घुसळण केल्यावर लेखक खोत यांच्यासारखे गुणवान रत्न जन्माला येते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. Krishnat Khot

येथील आरोग्यवर्धिनी केंद्रानजिकच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये गुरुवारी (ता.१) हा समारंभ पार पडला. माजी आ. सत्यजित पाटील-सरूडकर हे प्रमुख उपस्थित होते. द्वीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

माजी आ. सत्यजित पाटील म्हणाले, साहित्य विश्वातील मानप्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त करणे हे मोठे दिव्य आहे. मात्र गावखेड्यातील एका सामान्य घरातील लेखक माणसाला हा पुरस्कार मिळाला, हा शाहूवाडीच्या गुणी आणि कसदार मातीचा सन्मान आहे. त्यांची पुरस्कार प्राप्त 'रिंगाण' कादंबरी प्रत्येकाने डोळ्याखालून घालवावी. धरणग्रस्त लोकांचे विस्थापित जीवन अद्यापही क्लेशदायक आहे, अशी खंत व्यक्त करून सरकारने कोणत्याही विस्थापिताला वाऱ्यावर सोडू नये. तसेच नदी प्रदूषण, पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम राजकीय इव्हेंट ठरू नये, अशी कळकळीची आर्जवही त्यांनी केली.

सत्कारामूर्ती कृष्णात खोत म्हणाले, सद्या स्मृतिभ्रंशाचा काळ सुरू आहे. ज्ञानाची परिभाषा बदलली असून श्रीमंतीचे प्रदर्शन सुरू झाले आहे. शेतीत झाले नसतील तितके प्रयोग शिक्षण व्यवस्थेत झाल्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणाचे वाटोळे झाले. असे सांगत बदललेल्या शिक्षण पद्धतीवरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्मिक चिमटे काढले. वाचनात इयत्ता वाढवा तरच जगणे सुकर होईल. सावित्रीच्या लेकींनी सरस्वतीची पूजा करण्याऐवजी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला हवे. सामान्यांच्या आवाजात बोलतो तोच लेखक. पिढ्यांचं नुकसान करणारं ते शिक्षण कसलं? अशा शिक्षणाचा मांडलेला बाजार मोडायला पाहिजे.

दरम्यान, माजी आ. बाबासाहेब पाटील माजी आ. सत्यजित पाटील यांच्या हस्ते साहित्यिक कृष्णात खोत यांचा नागरी सत्कार झाला. तसेच स्पर्धापरीक्षेतून विविध प्रशासकीय पदांच्या सेवेत निवड झालेल्या घटकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, प्राचार्य जी. एस. पाटील, सरपंच भगवान नांगरे, उपसरपंच सुनीता रोडे, सरुड पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष कुराडे, नाथाजी नांगरे, कृष्णात पाटील, निवास थोरात आदींसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, साहित्य, कला, शिक्षण क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रा. पी. पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news