कोल्हापूर : लक्षतीर्थ मदरसावर कारवाईला विरोध, दिवसभर तणाव; पोलिसांचा मोठा फौजफाटा | पुढारी

कोल्हापूर : लक्षतीर्थ मदरसावर कारवाईला विरोध, दिवसभर तणाव; पोलिसांचा मोठा फौजफाटा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लक्षतीर्थ वसाहत येथील आलिफ अंजुमन मदरसावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला मोठा विरोध झाला. महिला आणि तरुणांनी घोषणाबाजी करत जेसीबी मशिनसमोरच ठिय्या दिल्यामुळे कारवाईत मोठा अडथळा झाला. यामुळे दिवसभर येथे तणाव निर्माण झाला. या परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. महिला आणि मुलांनी दिवसभर मदरसामध्येच ठिय्या दिला. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या बैठकीत कांही मुद्यांवर एकमत झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी उद्यापासून बांधकाम काढून घेण्याचे मान्य केल्यामुळे कारवाईसाठी गेलेली पथके परत फिरली.

लक्षतीर्थ वसाहतीमध्ये आलिफ अंजुमन या नावाची मदरसा अनाधिकृत असल्याने त्याच्यावर कारवाई करावी,अशी मागणी हिंदूत्वावादी संघटनांनी केली होती. हिंदूत्ववादी संघटनांच्या तगाद्यानंतर महापालिकेने संबधित ट्रस्टला नोटीस पाठवून बांधकाम पाडा.असे सांगीतले होते. तथापी,ट्र्स्टने बांधकाम काढले नसल्याने २७ डिसेंबरला महापालिकेचे पथक मोठ्या पोलिस फौजफाट्यासह कारवाईसाठी गेले. त्यावेळी देखील येथील विश्वस्तानी बांधकाम आमचे आम्ही काढून घेतो असे सांगून वेळ मारुन नेली होती.दरम्यानच्या काळात ट्रस्टकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने कांही काळ तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर २३ जानेवारीला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कारवाईस मनाई करणारा अर्ज नामंजूर केला होता.

बुधवारी ( दि.३१) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे पथक संपुर्ण तयारीनिशी मदरसावर कारवाई करण्यासाठी गेली. तीन जेसीबी, डंपर, अग्निशमन दलाची वाहने आणि कर्मचाऱ्यांची कुमक घेउन मदरसाजवळ गेले. कारवाईवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक हर्षवर्धन, पोलिस उपअधिक्षक अजित टीके, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा लक्षतीर्थ वसाहतीत तैनात ठेवला होता. महापालिकेचे पथक मदरशाच्या प्रवेशव्दारासमोर जाताच तेथे महिला आणि तरुण मुलांनी जेसीबी मशिसमोरच ठिय्या दिला. तसेच कांही तरुण जेसीबी मशिनच्या बास्केटमध्येही बसून राहिली.यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. महिलांचा एक मोठा गट तर थेट मदरसाच्या इमारतीतच जाउन बसला तर कांही महिला मदरशाच्या समोरील रस्त्यावर ठाण मांडून बसल्या.

महापालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर नगररचनाकार रमेश मस्कर, नारायण भोसले, मुस्लिम बांधवांना समजाउन सांगत असतानाच त्यांचा विरोध तीव्र होता. आम्ही अद्याप न्यायालयात जाणार आहोत. कारवाईची घाई करु नका.वेळ पडलीच तर आमचे आम्ही बांधकाम काढून घेउ,अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या.मुस्लिम समाजाच्यावतीने गणी आजरेकर,कादर मलबारी,रियाज सुभेदार तसेच आनंदराव खेडकर यांच्यासह कांही तरुण कार्यकर्ते अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते.आम्हाला थोडी मुदत द्या अशी मागणीही केली जात होती.

सकाळी सात वाजता जाग्यावर गेलेले पथक १० वाजले तरी कारवाई करु शकले. कार्यकर्त्यांची फोनाफोनी सुरु होती. महिला,मुले कांही केल्या जेसीबी समोरुन हटायला तयार नव्हते. घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होउ नये म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, अजित टिके यांनी देखील सामंजस्याची भूमिका घेत मुस्लिम समाजातील नागरिकांना समजाउन सांगण्याचाच प्रयत्न करत होते.

दरम्यान सकाळी अकरा वाजता यामध्ये जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी दुपारी दोन वाजता यासंदर्भात बैठक घेउ,असे सांगीतले.त्यामुळे दोन वाजताच्या बैठकीकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या पथकांने जेसीबी मशिन मदरसाच्या दारातून कांही अंतर मागे घेतला. पोलिसांनी देखील यावेळी मदरशाच्या प्रवेशव्दारावर बसलेल्या महिला आणि मुलांना तेथून हटविले. परंतु महिला शेजारच्या घरामध्ये तसेच मदरसामध्ये जाऊन बसल्या.

महिला आणि मुलांच्या हातात डॉ.आंबेडकरांची प्रतिमा

कांहीही झाले तरी मदरसावर कारवाई होउ नये,यासाठी मुस्लिम समाजाचा प्रयत्न होता. त्यासाठी ऐनकेन प्रकारचे प्रयत्न सुरु होते. कारवाई टाळण्यासाठी कांही तरुण मुले आणि महिलांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेउन ठिय्या मारला होता.

जैसे थे याचिका : जिल्हा न्यायालयाने नामंजूर केली

लक्षतिर्थ येथील मदरसाचे अनाधिकृत बांधकाम पाडू नये याकरीता अलिफ अंजूमन मदरसा सुन्नत जमात यांनी जिल्हा न्यायालयात एस.एस.तांबे यांचे कोर्टात अपिल दाखल करुन तातडीने आज पुन्हा सुनावणीसाठी घेतले. अनाधिकृत बांधकामाबाबत जैसे थे परिस्थिती ठेवावी अशी मागणी केली होती. तथा्पी न्यायालयाने हा अर्जही नामंजूर केला. महापालिकेच्यावतीने ॲड.प्रफुल राऊत, ॲड मुकुंद पोवार यांनी बाजू मांडली.

मुस्लिम समाजातील नेते सायंकाळी बैठक आटोपल्यानंतर पुन्हा लक्षतीर्थ वसाहतीत आले. त्यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तौफिक मुल्लाणी,गणी आजरेकर, कादर मलबारी,जाफरबाबा आदीसंह कार्यकर्त्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेच्या पथकामध्ये उपशहर नगररचनाकार रमेश मस्कर, शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, सहाय्यक अभियंता महादेव फुल्लारी,सुरेश पाटील, सुनिल भाईक,रमेश कांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा होता.

Back to top button