

सुभाष पाटील
विशाळगड :
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा ते बांबवडे या टप्प्यात सध्या वाहतूक कोंडीने उग्र रूप धारण केले आहे. रखडलेले महामार्गाचे काम, उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेली पर्यटकांची संख्या आणि लग्नसराई यामुळे शाहूवाडी तालुक्यातील हा मुख्य रस्ता सध्या कोंडीच्या गर्तेत सापडला असून, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वसलेले आंबा, मलकापूर हे कोकण आणि कोल्हापूरला जोडणारे महत्त्वाचे केंद्र आहे. सध्या लग्नसराईमुळे स्थानिक बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. त्यातच आंबा घाट, पन्हाळा आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या शेकडो वाहनांची भर पडत आहे. अवजड वाहतूक आणि दुचाकीस्वारांच्या अनियंत्रित संख्येमुळे तासनतास वाहतूक ठप्प होत असून, याचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना बसत आहे.
बायपास हाच एकमेव पर्याय
सध्या नागपूर-रत्नागिरी हायवेचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, आंबा ते बांबवडे हा टप्पा रेंगाळल्याने सर्व भार शहरांतर्गत रस्त्यांवर येत आहे. हा मार्ग जलदगतीने पूर्ण झाल्यास अवजड वाहतूक शहराबाहेरून वळवता येईल.
पोलीस प्रशासनाची कसरत
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आणि होमगार्ड भर उन्हात कसरत करत आहेत. मात्र, वाहनधारकांनी शिस्त पाळली तरच हे संकट दूर होईल. आता चेंडू लोकप्रतिनिधींच्या कोर्टात असून, बायपासचे काम मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.
"लग्नाच्या मुहूर्ताची वेळ निघून गेली, तरी आम्ही मलकापूरात अडकून पडलो होतो. रखडलेल्या कामामुळे हा महामार्ग आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे."
- अमित पाटील (प्रवासी, कोल्हापूर)
"उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाताना एवढा त्रास होईल असं वाटलं नव्हतं. तासनतास कोंडीत गाडी चालू ठेवावी लागत असल्यामुळे लहान मुले आणि वृद्धांचे हाल होत आहेत."
- सुप्रिया देसाई (पर्यटक, पुणे)
"दररोज तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत आहे. जोपर्यंत आंबा-बांबवडे बायपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. लोकप्रतिनिधींनी आतातरी याकडे गांभीर्याने पहावे,"
- संदीप जाधव, शाहुवाडी
"कोकणात जाण्यासाठी कोल्हापूर-रत्नागिरी हा मुख्य मार्ग आहे, पण इथली कोंडी पाहून प्रवासाचा आनंद निघून जातो. प्रशासनाने वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे," -
संजय यादव, साखरपा