

मारुती कांबळे
वैभववाडी : तळेरे-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा वेग अद्यापही अपेक्षेप्रमाणे वाढलेला नसून नाधवडे व कोकिसरे हद्दीत महत्त्वाचे टप्पे अपूर्णच राहिल्याने येत्या पावसाळ्यातही प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
तळेरे-कोल्हापूर हा पूर्वीचा राज्यमार्ग सप्टेंबर २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर या मार्गाच्या उन्नतीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला. करूळ घाट मार्गासह नाधवडे-कोकिसरे परिसरातील सुमारे १६ किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरण व रुंदीकरणासाठी सुमारे १९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या पहिल्या टप्प्यात करूळ घाटातील सुमारे ११ किलोमीटर भागाचे काम करण्यात आले असून उर्वरित भागावर काम सुरू आहे.
दुसऱ्या टप्प्यात तळेरे ते नाधवडे दरम्यानचा उर्वरित रस्ता काँक्रिटीकरणासाठी मंजूर झाला. मात्र, गेली दोन वर्षे काम सुरू असतानाही नाधवडे येथील सुमारे ७०० मीटर लांबीच्या रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने हा भाग अद्याप प्रलंबित आहे. यामुळे पूर्ण रस्ता एकसंघ करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजनेतून या ठिकाणी जुन्या रस्त्यावर डांबरीकरण केले असले तरी ते पावसाळ्यात टिकेल का, याबाबत नागरिकांमध्ये शंका आहे.
कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ उभारलेल्या भुयारी पुलाच्या जोडस्त्याचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या काम सुरू असले तरी पावसाळा तोंडावर आला असताना अपूर्ण कामांमुळे रस्त्यावर चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून अपूर्ण कामे गतीने पूर्ण करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वैभववाडी ते करूळ दरम्यान गटाराचे काम अद्याप अपूर्ण असून ते पूर्ण होणे आवश्यक आहे. वैभववाडी-संभाजी चौक येथे गटारावरील झाकण तुटल्याने या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. संबंधित यंत्रणेच्या ही गोष्ट लक्षात आणूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.
लवकरच भूसंपादन
कोकिसरे रेल्वे फाटक येथील भुयारी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे भूसंपादन प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. लवकरच भूसंपादन होऊन संबंधित जमीन मालकांना मोबदला दिला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी दिली आहे.