

Kolhapur Radhanagari road truck bike collision
कौलव : कोल्हापूर - राधानगरी मार्गावरील कौलव (ता. राधानगरी) येथील दत्त मंदिराजवळ मंगळवारी (दि.२१) दुपारी झालेल्या भीषण अपघातात तरसंबळे येथील बहिण-भावंडासह अडीच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला असून आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरसंबळे (ता. राधानगरी) येथील श्रीकांत बाबासाहेब कांबळे (वय 30) आणि त्यांची बहीण दिपाली गुरुनाथ कांबळे (वय 25, मुळगाव शेंडूर, ता. कागल) हे दोघे भोगावती येथून तरसंबळे कडे मोटरसायकलवरून जात होते.
दरम्यान, कौलव येथील दत्त मंदिराजवळ समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो (क्र. एमएच 14 डीएम 9836) चा चालकाचा ताबा सुटला आणि त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा टेम्पो राधानगरीहून कोल्हापूरकडे जात होता.
धडकेचा जोर इतका प्रचंड होता की श्रीकांत कांबळे आणि त्यांची अडीच वर्षांची मुलगी कौशिकी यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिपाली कांबळे ही रस्त्यात उपचाराअभावी मरण पावली. अपघातात अथर्व सचिन कांबळे (वय 8) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत श्रीकांत हे पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, केवळ पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचे निधन झाले होते, त्यामुळे ते गावी आले होते. दिपाली कांबळे यांचे पती काही वर्षांपूर्वी निधन पावले होते आणि त्या तेव्हापासून भावासोबत तरसंबळे येथे राहत होत्या. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. नातेवाईकांनी आक्रोश केला, तर संतप्त जमावाने टेम्पोच्या काचा फोडल्या. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.