

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरस येथून एक्टिवा दुचाकीवरून ट्रिपल सीट जाताना पोलिसांनी दोघांना पकडले होते. त्यातील एक पळून गेला होता. हा पळून गेलेला मुख्य संशयित कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला एका गुन्ह्यात सापडला. अक्षय राजू शेलार (वय 25, रा. इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याने हुमरस येथील एक दुचाकी चोरून नेत कोल्हापूरला पलायन केल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. यानंतर कुडाळ पोलिसांनी त्याला पेठ वडगाव न्यायालयाकडून गुरुवारी ताब्यात घेत अटक केली. शुक्रवारी त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता, वैयक्तिक जात मुचलक्यावर त्याची मुक्तता करण्यात आली.
30 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या सावंतवाडी पोलिसांना हुमरस येथे एक्टिवा दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणारे तरूण दिसले. त्यांनी थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी दुचाकी वेगाने पळवण्यास सुरूवात केली. मात्र पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग करुन ती तेलीवाडी येथे पकडली. त्यावेळी गंगाराम शंकर कांबळे (रा. गारगोटी - भुदरगड) याला पोलिसांनी पकडले, तर पळून गेलेल्या दोघांपैकी नितीन सुखदेव कांबळे (रा. गारगोटी- भुदरगड) याला दुसर्या दिवशी सकाळी सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरात पकडले होते. दरम्यान त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या दुचाकीच्या तपासणीत डिकीमध्ये एक एअर पिस्टल गन (एअर गन) व कोयता या शस्त्रांसह एक पाना सापडला होता. याप्रकरणी या तिघांवर शस्त्रे बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयित फिरत असल्याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. पळून गेलेल्या संशयिताचे ‘भाड्या’ असे टोपन नाव असल्याचे त्याच्या सहकार्यांनी तपासात सांगितले होते. दरम्यान कुडाळ पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी ही कारवाई केली त्याच दिवशी पहाटे हुमरस - तेलीवाडी येथील अनिकेत सुरेश सावंत यांच्या घरानजीकची एक्टिवा दुचाकी चोरीस गेल्याचे 1 ऑक्टोबर रोजी सकाळी निदर्शनास आले होते. दरम्यान, चार दिवसापूर्वी कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने त्या जिल्ह्यातील एका चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी अक्षय राजू शेलार याला पकडले. तेव्हा त्याच्याकडे हुमरस येथून चोरीस गेलेली एक्टिवा दुचाकी सापडली. याबाबत कोल्हापूर पोलिसांनी कुडाळ पोलिसांना माहिती दिली. यानुसार कुडाळ पोलिस ठाण्याचे हवालदार अनिल पाटील व रुपेश गुरव यांनी पेठवडगाव येथे जात तेथील न्यायालयाच्या परवानगीने संशयीत अक्षय याला ताब्यात घेतले. शनिवारी सायंकाळी उशिरा त्याला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले, असता न्यायालयाने त्याची वैयक्तिक जात मुचलक्यावर मुक्तता केली. त्यानंतर हवालदार श्री. पाटील व सुबोध मळगावकर यांचे पथक त्याला घेऊन संबंधित न्यायालयाच्या ताब्यात देण्यासाठी कोल्हापूर येथे रात्रीच रवाना झाले.