कोल्हापूर : ‘शाहूवाडी’त डोंगर पायथ्यालगतच्या ‘गावात धास्ती…!

कोल्हापूर : ‘शाहूवाडी’त डोंगर पायथ्यालगतच्या ‘गावात धास्ती…!
Published on
Updated on

विशाळगड, सुभाष पाटील : शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने दरड कोसळणे, भूस्खलन, जमीन खचणे, अशा कारणाने तालुक्यातील २० गावे भीतीच्या छायेखाली आहेत. पावसाचा जोर वाढल्याने किरकोळ पडझडींना सुरुवात झाली आहे. तालुक्यातील २० गावे-वाड्यांना संभाव्य भुस्खलनाचा धोका असुन संबधित कुटुंबियांना तशा सुचना प्रशासनाकडुन देण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दै 'पुढारी'शी बोलताना दिली. डोंगर पायथ्यालगतची गावांना धास्ती लागून राहिली आहे.

शाहूवाडी तालुका दुर्गम व डोंगराळ म्हणून परिचित आहे. विशेषतः वाडी-वस्त्या मोठ्या प्रमाणात डोंगरांजवळ वसलेल्या आहेत. सध्या पावसाचा जोर वाढल्याने किरकोळ भुस्खलनासह पडझडीचे प्रकार घडत आहेत. दरड कोसळणे, भुस्खलन, जमिन खचणे, रस्ता खचणे आदी प्रकार घडत आहेत. भुस्खलनामुळे मनुष्यहानी होऊ नये यासाठी प्रशासन अर्लट झाले आहे. संभाव्य भुस्खलन होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. डोंगर पायथ्याशी असणाऱ्या गावांचा व वाडी वस्तीचा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. माळीण गावावर डोंगर कोसळल्याने संपूर्ण गाव गाडले होते. या घटनेला सात वर्षे पूर्ण होत आहेत तोपर्यंत रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी मध्यरात्री डोंगर कडा कोसळून गाव दरडी खाली गाडलं गेलं. शाहूवाडी तालुका दुर्गम, डोंगराळ असल्याने अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील सुमारे २० गावे भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

२०१९ मध्ये कांडवन पैकी आगलावेवाडी येथे मोठे भूस्खलन झाले होते. या गावाला धोका असल्याने येथील २३ कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. गतवर्षी विशाळगड येथील भोसलेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात जमिनीला भेगा पडल्या होत्या. यावेळी येथील लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. सध्या येथील लोक भीतीच्या छायेखाली आहेत. प्रशासनाने संबंधित गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालुका प्रशासन तसेच महसूल विभागाच्या वतीने संबंधित गावांना स्थलांतराच्या नोटिसा यापूर्वीच दिल्या आहेत. संबंधित गावावर तलाठी, ग्रामसेवक आदींची करडी नजर आहे.

धोकादायक गावांची यादी :

घोळसवडे, पणुद्रे, कासार्डे, कांडवनपैकी आगलावेवाडी, माणपैकी ठाणेवाडी, गेळवडे, पुसार्ले, लोळाणे, करंजफेण, मरळी, सावर्डे, शिराळा तर्फ मलकापूर, विशाळगड (भोसलेवाडी), शित्तुर वारुण, कडवे पैकी शिंदेवाडी, उखळू, पणुद्रे पैकी हिंगाणेवाडी, भेंडवडे, उखळू पैकी आंबईवाडा पैकी खोतवाडी, शिराळे मलकापूर (धनगरवाडा). या गावांना भुस्खलनाचा धोका आहे.

प्रशासनाने हवे अलर्ट :

सध्या पावसाळा सुरू असून, डोंगर, दुर्गम भागात असलेल्या गावांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे अशा गावांनी भूस्खलन होतंय का? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा गावांत तालुका प्रशासनाने अधिक लक्ष देणे व नागरिकांना सतर्क ठेवणे गरजेचे आहे, तरच संभाव्य धोका टाळता येणार आहे.

तालुक्यात २० गावांना संभाव्य भूस्खलनाचा धोका असून  कांडवण, उखळू, कासार्डे, विशाळगड पैकी भोसलेवाडी या गावातील भूस्खलनाने बाधित होऊ शकणाऱ्या संबंधित लोकांना लेखी नोटीस देण्यात आलेल्या आहेत. कांडवण पैकी आगलावेवाडी व उखळू येथील धनगरवाड्यातील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर संततधार पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका असणाऱ्या इतर ठिकाणी देखील बाधीत होणाऱ्या लोकांना स्थलांतरित होणे बाबत तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील यांचे मार्फत प्रत्यक्ष भेटी देऊन सूचना देण्यात आलेल्या आहेत.
-रामलिंग चव्हाण (तहसीलदार, तथा तालुका व्यवस्थापन अधिकारी, शाहूवाडी)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news