पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माझी वसुंधरा २.० अभियानामध्ये पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने उत्कृष्ट कामगिरी करत पुणे विभागात प्रथम क्रमांक तर राज्यामध्ये नगरपरिषद या प्रवर्गात राज्यात चौथा क्रमांक पटकावला होता. दरम्यान रविवारी (दि.११) या स्पर्धेच्या बक्षीसाचीही शासनाने घोषणा केली असून, यामध्ये पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेस दीड कोटी रुपयांचे रोख बक्षीस प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी दिली.
निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान २.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये १६ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीमध्ये राबवण्यात आले. पन्हाळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाप्रमाणेच माजी वसुंधरा अभियानामध्ये आपली कामगिरी उंचावत शहराचा नावलौकिक पूर्ण जगभर वाढवला आहे. यासाठी पन्हाळा शहरातील सर्व नागरिक, नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी अधिकारी, सफाई मित्रांनी झोकून देऊन शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी योगदान दिले आहे.
नगरपरिषदेस मिळालेल्या बक्षिसाबद्दल डॉ. विनय कोरे यांनी पन्हाळा नागरिकांचे तसेच सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सर्व सफाई मित्रांचे व मुख्याधिकारी चेतन माळी यांचे अभिनंदन केले आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये उच्चतम कामगिरी करण्यासाठी सर्व सफाई मित्र आणि पन्हाळा येथील सर्व नागरिकांचे योगदान लाभले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी चेतन माळी यांनी दिली.