Kolhapur news | नागावमध्ये चिमुकलीचा 'करंट' लागून दुर्दैवी अंत

सुरक्षेचा बोजवारा: परप्रांतीय मजूर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Electrocution death news
Electrocution death news
Published on
Updated on

सुनील कांबळे

नागाव : पोटाची भूक भागवण्यासाठी आणि चार पैसे कमवून कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी हजारो मैल दूरवरून आलेल्या एका निष्पाप परप्रांतीय मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. नागाव (ता. हातकणंगले) येथील संभाजी नगर परिसरात घरमालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि विजेच्या उघड्या तारांमुळे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या बालिकेचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला.

भाड्याच्या हव्यासापोटी मजुरांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या घरमालकांच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप चिमुकलीचा हकनाक बळी गेल्याने परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. शिरोली एमआयडीसी हा परिसर औद्योगिक केंद्र असल्याने येथे पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर भारत व इतर राज्यांतून आलेले शेकडो परप्रांतीय मजूर वास्तव्यास आहेत. नागाव येथील संभाजी नगरमध्ये साळोखे नामक घरमालकाने आपल्या घरामध्ये अनेक परप्रांतीय मजूर कुटुंबे भाडेकरू म्हणून ठेवली आहेत. या घराच्या परिसरात आणि भाडेकरू राहतात त्या जागेत विजेच्या वायर्स अत्यंत बेदरकारपणे आणि उघड्या स्वरूपात पसरलेल्या आहेत.

Electrocution death news
Nashik Municipal Corporation | जुने नाशिक हादरले! 50 हून अधिक दुकानांवर महापालिकेचा 'जेसीबी'चा हातोडा

नेहमीप्रमाणे खेळत असताना या तीन वर्षांच्या चिमुकल्या बालिकेचा अनवधानाने या उघड्या विजेच्या वायरला स्पर्श झाला. विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की, काही क्षणांतच या चिमुकलीला जोरदार करंट लागला. काही समजण्याच्या आतच विजेच्या धक्क्याने त्या निष्पाप बालिकेचे शरीर काळे-निळे पडले. तिला वाचवण्याची संधीही निसर्गाने दिली नाही आणि तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

भाड्याचा हव्यास, सुरक्षेला हरताळ

शिरोली आणि नागाव परिसरात मजुरांची संख्या मोठी असल्याने भाड्याच्या उत्पन्नासाठी अनेक घरमालक छोट्या-छोट्या खोल्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मजूर ठेवतात. मात्र, त्यांना मूलभूत सुविधा देताना आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेताना कमालीची टाळाटाळ केली जाते. संभाजी नगरमधील या घरातही वायर्सचे उघडे जाळे मृत्यूचा सापळा बनून पसरले होते. "फक्त भाडे वसूल करायचे, पण सुरक्षेशी आमचे काही देणेघेणे नाही," या घरमालकाच्या याच घातक मानसिकतेमुळे एका गरिबाच्या घरचा दिवा विझला आहे.

Electrocution death news
Maharashtra Senior Citizens Abuse: अहिल्यानगर जिल्ह्यात 529 ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी; मुलांकडून छळाच्या घटनांत वाढ

पोटाची भूक भागवायला आले अन्...

आपले गाव, नातेवाईक सोडून केवळ दोन वेळच्या अन्नाची भ्रांत मिटवण्यासाठी हे मजूर कुटुंब महाराष्ट्रात आले होते. हातावर पोट असणाऱ्या या आई-बापाने आपल्या काळजाच्या तुकड्याला डोळ्यांदेखत गमावले. चिमुकलीचा निष्प्राण आणि काळा-निळा पडलेला देह पाहून माता-पित्याने केलेला आक्रोश उपस्थितांची काळजे पिळवटून टाकणारा होता. पोटाची भूक भागविण्याच्या संघर्षात या परराज्यातून आलेल्या कुटुंबावर दुःखाचा इतका मोठा डोंगर कोसळला आहे, ज्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही.

स्थानिकांमधून कारवाईची मागणी

या घटनेनंतर नागाव आणि संभाजी नगर परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळणाऱ्या अशा बेजबाबदार घरमालकांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आज एका निष्पाप चिमुकलीचा बळी गेला, उद्या अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news