

जयसिंगपूर : शेडनेटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता रमेश कांबळे (वय ५२) आणि त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे (वय ३०, खाजगी इसम) यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), कोल्हापूर यांनी ही कारवाई केली.
यातील तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या नावे 'ग्रीन नेट' या नावाने शेडनेटचा व्यवसाय सुरू करायचा होता. या व्यवसायासाठी आवश्यक असलेली तांत्रिक परवानगी आणि ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी त्यांनी जैनापूर ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. या अर्जाच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदार जेव्हा सरपंच सौ. संगिता कांबळे यांना भेटले, तेव्हा त्यांनी हे काम करून देण्यासाठी १०,०००/- रुपयांच्या लाचेची मागणी केली.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, सरपंच कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत या दोघांनी १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ९,०००/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कारवाई दरम्यान, सरपंच आणि त्यांच्या मुलाने "काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे घेणार नाही, काम पूर्ण झाल्यावर पैसे द्या," असे म्हणत पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, पडताळणीमध्ये लाचेची मागणी सिद्ध झाल्याने, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये दोघांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.