

परभणी : काम करून घ्यायचं असेल तर पैसे मोजावेच लागतात, ही विकृत मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली आहे. मित्राच्या लग्नासाठी केवळ एक दिवसाची रजा मंजूर करून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.१६) दुपारी तीन वाजता रंगेहाथ अटक केली. रतन नामदेव शेलार (वय ४७) लाचखोर वाहतूक निरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील ३५ वर्षीय चालकाने २१ एप्रिल रोजी मित्राच्या लग्नासाठी एक दिवसाची रजा मंजूर करून घेण्याकरिता अर्ज केला होता. मात्र, संबंधित वाहतूक निरीक्षक रतन नामदेव शेलार (वय ४७) यांनी रजा मंजुरीसाठी ५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १५ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत गुरुवारी (दि.१६) दुपारी सापळा रचण्यात आला. पडताळणी दरम्यान आरोपी शेलार यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बसस्थानक परिसरातील त्यांच्या कक्षात सापळा कारवाई करण्यात आली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने ५०० रुपयांची रक्कम दिल्यानंतर आरोपीने ती स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात लाचप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती व आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर आरोपीच्या घराची झडतीही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा पवार यांच्या पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, अल्प रकमेच्या लाचेसाठीही अधिकारी हात रंगवताना पकडला गेल्याने सरकारी यंत्रणेत अजूनही भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.