

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आजच्या द्वितीया तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अष्टभुजा सिंह वाहिनी दुर्गेच्या रूपात सजली आहे. दुर्गा म्हणजे दुर्गम असुराला मारणारे जगदंबेचे स्वरूप महात्म्याच्या अकराव्या अध्यायात देवीने स्वतःच्या भविष्यात्मक अवतारांचा उल्लेख केला आहे. त्या वेळेला पुढे दुर्गमसुराला मारल्यानंतर माझे नाव दुर्गा म्हणून प्रसिद्ध होईल असे वचन देवीने स्वतः दिलेले आहे. या स्वरूपात भगवती अष्टभुजा धारण करून सिंहावरती विराजमान आहे.
हातामध्ये शंख, चक्र, खड्ग, धनुष्यबाण, वरद, कमळ, त्रिशुळ, तलवार आदी आयुधं धारण करीत असते दुर्गा या नावाने आदिशक्तीच्या दुस्तर म्हणजे अवघड गोष्टींना सुद्धा सोपं करणारी या रूपाचा बोध होतो. आजच्या द्वितीया तिथीला जगदंबेचे हे देवी कवचात वर्णन केलेल्या नवदुर्गांनी युक्त अष्टभुजा स्वरूप अनिलराव कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी साकारले आहे.