

कडगाव, पुढारी वृत्तसेवा : दीर्घ विश्रांतीनंतर पावसाने भुदरगड तालुक्यात दमदार सुरुवात केली. मागील पंधरा दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाटगाव (Patgaon Dam) येथील मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणाच्या सांडव्यातून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पाटगाव धरण भरल्याने भुदरगड तालुक्यासह, कागल, कर्नाटक राज्यातील काही गावांचा वर्षभराचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पाटगाव धरण (Patgaon Dam) सन 2021 मध्ये 9 सप्टेंबर तर गतवर्षी 2022 मध्ये 10 सप्टेंबरला भरले होते. पण यावर्षी थोडा विलंब होऊन सोमवारी (दि. 25) दुपारी पावणे चारच्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने भरले. यावर्षी जून व ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे धरण भरण्यास विलंब झाला. या वर्षी मे महिन्यानंतर पाऊस लांबला तर पिण्याची टंचाई भासू नये, म्हणून जूनमध्ये धरणांमध्ये 20 टक्के राखीव पाणीसाठा शिल्लक ठेवला होता. शिल्लक साठा ठेवला नसता तर या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले नसते. ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबरमध्ये तालुक्यात व धरण परिसरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता. त्यामुळे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणात सुमारे ३.७५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात जुनपासून आज अखेर सुमारे 6465 मिमि पावसाची नोंद झाली आहे. प्रकल्प पाणी पातळी – 626.60 मी. इतकी झाली आहे.
आजचा एकूण पाणीसाठा – 105. 240 द.ल.घ. आहे. गतवर्षाच्या तुलनेत सुमारे १२१५ मिमी जादा पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात पाटगाव परिसरात 00 मिमि पावसाची नोंद झाली आहे. सध्या सांडवा विसर्ग 00 क्युसेक, विद्युत गृह विसर्ग 00 क्युसेक सिंचन मोचक विसर्ग 00 क्युसेक आहे. तालुक्यातील कोंडूशी, नागणवाडी आणि फये लघुप्रकल्प अगोदरच भरले आहेत. वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत थोडीशी वाढ झाली आहे, असे शाखा अभियंता मनोज देसाई यांनी सांगितले.
या वर्षी पाटबंधारे विभागाने नियोजन करून अवर्तनानुसार शेती व पिण्यासाठी धरणातून वेदगंगा नदीत पाणी सोडले होते. प्रत्येक 15 दिवसांनी विसर्ग चालू केला होता. पाऊस लांबला तर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून जूनमध्ये धरणामध्ये 20 टक्के राखीव पाणीसाठा शिल्लक ठेवला होता. शिल्लक साठा ठेवला नसता तर या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले नसते.
हेही वाचा