कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाला प्रशासनाने घातलेले निर्बंध झुगारून गणेशभक्तांनी शनिवारी पंचगंगेच्या प्रवाहात मूर्तींचे विसर्जन केले. दुपारी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पोलिस आमने-सामने आल्यानंतर थेट बॅरिकेडिंग तोडून हिंदुत्ववादी कार्यकर्ते मूर्ती घेऊन घाटावर गेले. त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त हटविला. रात्री उशिरापर्यंत नदीमध्ये विसर्जन सुरू होते. या प्रकारामुळे गेल्या तीन वर्षांपासून पंचगंगेवर सुरू असलेली पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनाची परंपरा यंदा खंडीत झाली आहे.
गणेशमूर्ती विसर्जनाला मनाई असतानाही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गणेशभक्तांना पंचगंगा नदी घाटावर येण्याचे आवाहन केले होते. खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनानेही सकाळपासून प्रचंड फौजफाटा तैनात केला होता. घाटावर जाणारे सर्व मार्ग बॅरिकेडिंगने अडविण्यात आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पोलिस आमने-सामने आले. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग उचकटून घाटावर प्रवेश केला.
महापालिका प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी दोन दिवसांपासून सुरू होती. पंचगंगा नदीमध्ये विसर्जन होणार नाही यासाठी शहरात सर्व प्रभागांमध्ये कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 180 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.
नदी घाटाला पोलिस छावणीचे स्वरूप
बुधवारी (दि. 20) दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळीही पंचगंगा घाटावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद झाला होता. तेव्हाही अनेक मूर्तींचे थेट नदीत विसर्जन करण्यात आले. यामुळे शनिवारी सकाळपासूनच घाटावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता. उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, अविनाश कवठेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तैनात होते.
प्रवेशाच्या मार्गावर बॅरिकेडिंग
घाटाकडे जाणारे मार्ग बॅरिकेडिंगच्या सहाय्याने बंद करण्यात आले होते. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी मूर्ती दान, कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था याची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. घाटाकडे कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.
हिंदुत्ववादी कार्यकर्ते – पोलिस वादावादी
दुपारी 3 पासून नदीकडे येणार्या भक्तांची संख्या वाढत होती. साडेतीनच्या सुमारास बंडा साळुंखे, उदय भोसले, शिवानंद स्वामी, किरण दुसे, किशोर घाटगे, अॅड. सुधीर वंदूरकर यांच्यासह प्रमुख हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गणेशभक्तांना पंचगंगा नदीकडे सोडण्याचा आग्रह सुरू केला. पोलिस, महापालिका अधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांत वादावादी झाली. अखेर बॅरिकेडिंग तोडून कार्यकर्ते घाटावर दाखल झाले. पाठोपाठ गणेशभक्तांनीही पंचगंगा नदीमध्ये विसर्जन सुरू केले.
मूर्तिदान चळवळीला धक्का
जिल्ह्यात गतवर्षी तीन लाखांवर गणेशमूर्ती दान करण्यात आल्या होत्या. शहरासह तालुका पातळीवरही ही मूर्तिदान चळवळ यशस्वी ठरली होते. या मूर्तींचे इराणी खणीमध्ये विधिवत विसर्जनही करण्यात आले होते. अनेक वर्षांपासून सुरू असणार्या मूर्तिदान चळवळीला मागील तीन वर्षांत उदंड प्रतिसाद मिळाल्याने पंचगंगा नदी घाटावरील विसर्जन पूर्णपणे बंद झाले होते. दरम्यान, शनिवारी घडलेल्या घटनेने मूर्तिदान चळवळीला धक्का बसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.