कोल्हापूर: गणेश विसर्जनादिवशी चिकोत्रा काठावर रंगली 'न्याल' परंपरा | पुढारी

कोल्हापूर: गणेश विसर्जनादिवशी चिकोत्रा काठावर रंगली 'न्याल' परंपरा

माध्याळ: पुढारी वृत्तसेवा: चिकोत्रा नदीकाठावरील अर्जुनवाडा – करड्याळ (ता.कागल) या गावांनी शेकडो वर्षांची ‘न्याल परंपरा’ यावर्षी कायम राखत उत्साहात साजरी केली. संगणक युगातही सुशिक्षित तरुणींनी आपल्या संस्कृतीच्या रक्षणाप्रित्यर्थ न्यालला आवर्जून हजेरी लावली. (kolhapur news)

दोन गावच्या युवती, महिला, माहेरवाशिणी यांनी चिकोत्राच्या पाण्यात उतरून एकमेकींचा शेलक्या शब्दांत उध्दार केला. हातात कडुलिंब वृक्षाचे डहाळे घेऊन एकमेकींच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवले. चिंब भिजलेल्या महिलांना राग अनावर झाल्याने एकमेकींच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. पुरुषांनी वेळीत हस्तक्षेप करीत महिलांना आवरले. नेमके गणपती विसर्जनादिवशी ही परंपरा कायम ठेवली जात असल्याने युवती, माहेरवाशिणींची झुंबड उडते. पुरुष मंडळी या महिलांना शिव्यांची लाखोली वाहत गावाकडे परतात. यावर्षी चिकोत्रा पात्रात कमी पाणी असल्याने महिलांनी चांगलाच आनंद लुटला. काहींनी संधी साधत वचपा काढण्यासाठी ठेवणीतल्या शब्दांची प्रतिस्पर्धी महिलांवर उधळण केली. ही परंपरा पाहण्यासाठी आसपासच्या ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. (kolhapur news)

गेली शेकडो वर्षे दोन्ही गावाच्या महिला मोठ्या उत्साहात ‘न्याल परंपरा’ जिवंत ठेवण्यासाठी गणेश विसर्जनादिवशी सर्व कामाला फाटा देत चिकोत्रा पात्रात उतरतात. ‘न्याल’ म्हणजे दोन गावातील वाद सामंजस्याने मिटवणे. अड्याल शंकर धुणे धुतो..पल्याड गौराई न्याल गं…अशी पारंपरिक गीत गात देवीची आराधना केली जाते.

हेही वाचा 

Back to top button