

Kolhapur Marine Engineer on ship
कोल्हापूर : इराकमधील खोर अल जुबैर बंदरातून अमेरिकेकडे निघालेल्या क्रूड ऑईल जहाजावर मिसाईल हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. SONANGOL NAMIBE या टँकरवर हा हल्ला झाला असून या जहाजावर कोल्हापूर जिल्ह्यातील मरीन इंजिनिअर रोहित राजेंद्र पाटील कार्यरत असल्याची माहिती त्यांचे बंधू यांनी 'पुढारी न्यूज'शी सांगितले. सुदैवाने रोहित पाटील यांच्यासह जहाजावरील सर्व २३ कर्मचारी सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, SONANGOL NAMIBE हे क्रूड ऑईल टँकर इराकमधील Khor Al Zubair Port येथून अमेरिकेकडे रवाना झाले होते. प्रवासादरम्यान अज्ञातांकडून जहाजावर मिसाईल हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
या टँकरवर कोल्हापूरमधील मरीन इंजिनिअर रोहित राजेंद्र पाटील यांच्यासह एकूण २३ जणांचा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. हल्ल्यानंतर जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची स्थिती सुरक्षित असल्याची माहिती समोर आली असून त्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेत सर्वात मोठा धोका म्हणजे जहाजावर असलेले क्रूड ऑईल होते. मात्र सुदैवाने हल्ल्यापूर्वीच जहाजावरील क्रूड ऑईल रिलीज करून उतरवण्यात आले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जहाजावरील सर्व २३ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.