

Kolhapur Farmers Burn Tripod Stands Shaktipeeth Expressway Survey
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावरून भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संतापाचा मंगळवारी (दि.२४ ) उद्रेक झाला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात आणि गावकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता महामार्गाच्या मोजणीसाठी दाखल झालेल्या प्रशासनाच्या पथकाला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. कोनवडे येथे मोजणीसाठी वापरण्यात येणारे ट्रायपॉड स्टॅन्ड संतप्त शेतकऱ्यांनी हिसकावून घेत भररस्त्यात पेटवून दिले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
कोनवडे, नाधवडे, निळपण, म्हसवे आणि दारवाड परिसरात शेतकऱ्यांनी मोजणी रोखत महामार्गाविरोधातील आपला तीव्र संताप व्यक्त केला. शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोनार्क कंपनीचे पथक आज पहाटेच म्हसवे, निळपण, दारवाड, नाधवडे तसेच कोनवडे परिसरातील ओढे आणि शेतशिवारात दाखल झाले होते. पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या हालचालींची कुणकुण पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना लागली. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर काही वेळातच शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थ मोजणीच्या ठिकाणी जमा झाले. त्यामुळे पहाटेच्या शांततेत सुरू झालेल्या मोजणी मोहिमेला काही क्षणांतच तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.
अचानक सुरू करण्यात आलेल्या मोजणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. आमच्या जमिनीची मोजणी करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? आमच्या संमतीशिवाय आमच्या शेतशिवारात येऊन मोजणी कशी करता? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. 'जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची', 'शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे', अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांच्या रोषापुढे मोजणी पथकाची चांगलीच कोंडी झाली.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रांताधिकारी हरिश सूळ आणि तहसीलदार अर्चना पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महामार्गाला विरोध असताना मोजणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी आपला विरोध कायम ठेवला. अधिकाऱ्यांना जाब विचारत मोजणी तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली.
शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष यापूर्वीही विविध आंदोलनांतून व्यक्त झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध कायम असताना पहाटेच्या अंधारात पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्याने या असंतोषाला आज उघडपणे वाट मिळाली. शेतजमीन, उपजीविका आणि भविष्यातील शेतीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.