

Kolhapur Kagal Boy Killed Mother Injured
सिद्धनेर्ली: सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, माकडाच्या उडीमुळे वाळलेले नारळाचे झाड घरावर कोसळल्याने १० वर्षीय आयुष चौगुले या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठच्या सुमारास दादू खानू सकट यांच्या घराच्या छतावर अचानक नारळाचे झाड कोसळले. माकडाने वाळलेल्या झाडावर उडी मारल्याने त्याचा समतोल बिघडला आणि ते थेट पत्र्याच्या घरावर येऊन पडले. त्याच बरोबर नारळाच्या झाडाचा काही भाग देखील कोसळला.
या दुर्घटनेच्या वेळी घरात काजल आकाश चौगुले आणि त्यांचा मुलगा आयुष हे दोघेही झोपलेले होते. झाड थेट छतावर पडल्याने पत्रे फुटून ते आयुषच्या डोक्यावर आदळले. या अपघातात आयुषच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
ग्रामस्थांनी तातडीने त्याला उपचारासाठी कागल येथील सरकारी रुग्णालयात हलवले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेत आई काजल चौगुले देखील जखमी झाल्या आहेत.
मृत आयुष हा मूळचा कोल्हापूरच्या टिंबर मार्केट परिसरातील असून, शिक्षणासाठी तो आपले आजोबा दादू सकट यांच्याकडे सिद्धनेर्ली येथे वास्तव्यास होता. तो येथील मराठी शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, कागल पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.