Kolhapur Water Lifting Ban Relaxed |उपसाबंदी आणखी तीन दिवस शिथिल

जलसंपदा विभागाचा निर्णय; शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा
Kolhapur Water Lifting Ban Relaxed
Kolhapur Water Lifting Ban Relaxed AI photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून उपलब्ध पाणीसाठा असलेल्या ठिकाणी उपसाबंदी आणखी तीन दिवसांसाठी शिथिल करण्यात आली आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे देण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्व धरणे १०० टक्के भरलेली असतानाही पाटबंधारे विभागाने कोणतीही पुरेशी पूर्वसूचना न देता उपसाबंदी लागू केली होती. त्यानंतर ती काही काळ शिथिल करून अवघ्या चार तासांत पुन्हा रात्री दहा वाजता लागू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या निर्णयाच्या निषेधार्थ इरिगेशन फेडरेशनने पाटबंधारे कार्यालयासमोर चार दिवस ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, खासदार धैर्यशील माने आणि आमदार अमल महाडिक यांनी आंदोलक व अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी यशस्वी संवाद साधला होता. त्यानंतर २०, २१ आणि २३ जून रोजी उपसाबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

उपलब्ध पाणीसाठा असलेल्या ठिकाणी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसांसाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उपसाबंदी शिथिल करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. या निर्णयानुसार ज्‍योती देवकर यांनी महावितरणला पत्र देऊन बुधवारपासून शुक्रवारपर्यंत नदीतीरावरील मोटारींचा विद्युतपुरवठा सुरू ठेवण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. दरम्‍यान, वरिष्‍ठ कार्यालयातील आदेशानुसार पाणी उपलब्‍ध असेल तेथे उपसा शिथिल केल्‍याचे कार्यकारी अभियंता ज्‍योती देवकर यांनी सांगितले. आ. विनय कोरे, खा. धैर्यशील माने यांना परिस्थितीची माहिती दिली. खा. माने यांनी मुख्य अभियंता अहिरराव, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून उपसाबंदी शिथिल केल्‍याचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी सांगितले.

ऊस, भाजीपाल्‍यासह इतर पिकांना लाभ

या निर्णयामुळे ऊस, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून पुढील काळातही उपसाबंदी पूर्णपणे शिथिल करण्याची मागणी इरिगेशन फेडरेशनने कायम ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news