

PSI Selection 2026
खोची : जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर खोची येथील आकाश दिनकर केडगे याने पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाला गवसणी घातली. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून निवडीची बातमी समजताच मित्रपरिवाराने आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
आकाश केडगे याने दुसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करत यश संपादन केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्याने कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले. त्याचे वडील रोजंदारीवर मजुरी करणारे असून कष्टाळू स्वभावामुळे परिसरात परिचित होते. मात्र अपघातामुळे ते अंथरुणाला खिळले आणि त्याच काळात आईचेही निधन झाले. या कठीण प्रसंगानंतरही आकाश खचून न जाता मामांच्या घरी राहून अभ्यास करत राहिला.
आकाशचे प्राथमिक शिक्षण खोची येथील विद्यामंदिर येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण राजे शहाजी हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. पुढे पेठ वडगाव येथील विजयसिंह यादव महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण त्याने घेतले. या प्रवासात मामा आणि आजोळच्या नातेवाईकांचे मोठे पाठबळ मिळाल्याचे आकाशने सांगितले. त्याचा लहान भाऊ सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही अभ्यासाची जिद्द
आकाश केडगे यांच्या घरी परिस्थितीमुळे विजेची सोयही नव्हती. त्यामुळे दिवसा उजेड असेल तेव्हाच अभ्यास करावा लागत असे. रात्री अभ्यासासाठी तो मित्रांच्या घरी जात असे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान त्याने काही अन्य परीक्षांतही यश मिळवले होते; मात्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्धार त्याने मनाशी केला होता. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर त्याने पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले.
यापुढेही अभ्यास सुरू ठेवून आणखी उच्च पद मिळवण्याची इच्छा असल्याचे आकाश केडगे याने व्यक्त केले.