

Shirish Chougule MPSC Success
नागाव : हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील शिरीष पावलस चौगुले यांने अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशामुळे हेरले गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्राथमिक शिक्षक पावलस चौगुले यांचा शिरीष हा मुलगा आहे.
शिरीषने कोल्हापुरातील डी वाय पाटील कॉलेजवर बी ई मेकॅनिकल हा इंजीनियरिंग अभ्यासक्रम पूर्ण केला होता. पण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याची त्यांची मनापासून तीव्र इच्छा होती. म्हणून त्याने थेट पुणे गाठले. आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर दुसऱ्या फेरीमध्ये ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत आपल्या कुटुंबासह गावाचेही नाव उज्ज्वल केले आहे. ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून त्यांनी अनेक तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावातील नागरिक, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत असून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.