

महादेव शहापुरे
कवठेगुलंद : गणेशवाडी ता. शिरोळसह कृष्णा नदी पलीकडे सात गावातील परिसरात गेल्या काही दिवसांपासून सणासुदीच्या आणि घरगुती कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेऊन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध, चक्का, खवा आणि बासुंदीची विक्री होत असल्याची शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित अन्न व औषध प्रशासन यावर कधी धडक कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गणेशवाडी व आसपासच्या परिसरात काही व्यावसायिक छुप्या पद्धतीने कमी दर्जाचा चक्का, पनीर,खवा आणि कृत्रिम बासुंदी तयार करून ती ग्राहकांच्या माथी मारत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. बासुंदी दाट करण्यासाठी आणि खव्याचे वजन वाढवण्यासाठी आरोग्याला घातक असणारे पदार्थ वापरले जात असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वीही तालुक्यात अनेक ठिकाणी भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर कारवाया झाल्या आहेत, मात्र गणेशवाडी परिसरात अद्याप कोणतीही मोठी तपासणी मोहीम राबवली गेलेली नाही. केवळ सण-उत्सवाच्या काळातच नव्हे, तर नियमितपणे अशा दुकानांची आणि गोदामांची तपासणी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
बाहेरून येणारा खवा आणि स्थानिक पातळीवर तयार होणारी बासुंदी यांची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. प्रशासनाने तात्काळ यांचे नमुने घेऊन लॅब टेस्टिंगसाठी पाठवावे आणि दोषींवर कडक गुन्हे दाखल करावेत. सध्या गणेशवाडीतील सजग नागरिकांचे डोळे अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकाराची दखल घेऊन धाडी टाकल्यास भेसळखोरांचे धाबे दणाणतील. अन्यथा, नागरिकांना आपल्या आरोग्यासाठी आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागेल, असा इशाराही काही स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.