कोल्हापूर : कोल्हापुरात पुन्हा पावसाचे कमबॅक झाले आहे. शहरात रविवारी सायंकाळनंतर धुवाँधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यासह राधानगरी, दूधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, धामणी, कोदे या नऊ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. रविवारी राधानगरी धरण ७१.५८ टक्के भरले. दिवसभऱात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांची वाढ होऊन पातळी रात्री १२ वाजता २२.१ इंचांवर होती. जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली गेले असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
शहरात रविवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यानंतर काही काळ पावसाने उघडीप दिली. सायंकाळी ४.३० नंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. रात्री धुवाँधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील १२ तालुक्यांत सरासरी १९.१ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ७६ मि.मी. गगनबावडा तालुक्यात झाला.
शनिवारी रात्री १२ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी १९ फूट ११ इंचांवर होती. रविवारी यामध्ये २ फूट २ इंचांची वाढ होऊन रात्री १२ वाजता पातळी २२ फूट १ इंचावर स्थिरावली. जिल्ह्यातील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, बाजार भोगाव, काटे, करंजफेण, पेंडाखळे, वालोली, यवलूज, खडक कोगे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
शहरातील काही भाग अंधारात
शहरातील काही भागात रविवारी रात्री विजेची ये-जा सुरू होती. त्यामुळे मिरजकर तिकटी, बिंदू चौक, दसरा चौक, ताराबाई पार, नागाळा पार्क शासकीय विश्रामगृह परिसर हा भाग काही काळासाठी अंधारात गेला होता. ताराबाई पार्क परिसरातील आयकर भवन येथे असणाऱ्या महावितरणच्या ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड झाल्याने या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू होते. असे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.