kolhapur | भयभीत शेतकऱ्यांची बिबट्याला ‘झटका’ देण्याची तयारी!

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत अनेक शेतांमध्ये बिबट्यांची नाकाबंदी : उपाय माणसांच्या जीवावर बेतण्याचा धोका
kolhapur |
kolhapur | भयभीत शेतकऱ्यांची बिबट्याला ‘झटका’ देण्याची तयारी!
Published on
Updated on

कोल्हापूर : बिबट्याच्या उपद्रवामुळे भयभीत झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी बिबट्यालाच ‘झटका’ द्यायची तयारी केलेली दिसत आहे. पण हा उपाय बिबट्यासह अन्य वन्य प्राणी आणि माणसांच्याही जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातच बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली दिसत आहे. जंगलांच्या बाहेर असलेल्या बिबट्यांची नेमकी संख्या समजून येत नसली तरी पश्चिम महाराष्ट्रातील चार-पाच जिल्ह्यांत मिळून किमान तीन-चारशे बिबटे शेत शिवारात वावरत असल्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी शहरी भागातही बिबट्याचा वावर वाढलेला आहे. बिबट्यांनी माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसत आहे. शेत शिवारांमध्ये बिबट्यांचा वावर हमखास आढळून येत आहे. बिबट्याचा वावर असलेल्या भागात मजुरी करण्यास मजूर मिळत नसल्याचे दिसते. शेतकरीही बिबट्यांच्या भीतीच्या छायेखालीच शेतात वावरत आहेत. यावर उपाय म्हणून या भागातील काही शेतकऱ्यांनी बिबट्याला ‘झटका’ देण्याची तयारी केलेली दिसत आहे.

अंगलट येणारी बाब!

या भागातील काही शेतकरी जरी बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी झटका लावत असले तरी त्यात अडकून अन्य वन्य प्राणीही दगावण्याची शक्यता आहे. वन्य प्राणीच नव्हे तर चुकून अशा शेतात जाणारा माणूसही झटका बसून गारद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकाराला वेळीच पायबंद घालण्याची आवश्यकता वर्तविण्यात येत आहे.

झटका म्हणजे काय?

झटका ही प्रामुख्याने कोकणातून आलेली संकल्पना आहे. जंगली श्वापदांनी शेतीचे नुकसान करू नये म्हणून कोकणातील लोक या झटक्याचा वापर करतात. शेताच्या चहुबाजूंनी लाकडी खांब उभा करून त्या खांबांभोवती ॲल्युमिनियम, तांबे किंवा लोखंडी तार गुंडाळली जाते. रात्रीच्या वेळेस या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला जातो. वन्य प्राणी या तारेच्या संपर्कात आले की त्यांना विजेचा जोरदार झटका बसतो. यालाच झटका म्हटले जाते. अशा झटका लावलेल्या शेतात जाणे वन्यप्राणी टाळतात. त्यामुळे शेतीचे नुकसान होत नाही. असाच झटका आता या भागातही काही ठिकाणी लावलेला दिसून येत आहे.

वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ आणि भारतीय दंड संहितेतील कलम ४२९ व ४२९ अन्वये कोणत्याही वन्यप्राण्याचा जाणूनबुजून जीव घेणे हा गंभीर स्वरूपाचा अपराध आहे. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास संबंधिताला ३ ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि २५ हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. वारंवार असा गुन्हा केल्यास तुरुंगवास आणि दंडाची रक्कम त्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे झटका लावण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कायद्याची परिपूर्ण माहिती घ्यावी.-
तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news