

Kolhapur Ganesh Visarjan Latest News
शेखर पाटील, कोल्हापूर
कोल्हापूरमधील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा संथगतीने सुरू होती. शेवटी रात्री पावणे बाराच्या सुमारास महाद्वार रोडवर संथगतीने पुढे जाणाऱ्या मंडळांना पोलिसांनी सौम्य लाठीमारचा ‘प्रसाद’ दिला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मंडळांचा वेग वाढला आणि मिरवणूक पुढे गेली. तर रात्री बारा वाजता सर्व मंडळांचा डीजेचा दणदणाट बंद झाला.
कोल्हापूरमधील महाद्वार रोडवर येथे रात्री अकराच्या सुमारास अनेक मंडळं पोहोचली. मात्र, मंडळं संथगतीने पुढी जात होती. वेग मंदावल्याने मंडळांच्या रांगा लागल्या. शेवटी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना पुढे जायला सांगितले. रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दणका देताच मंडळांच्या कार्यकर्त्यांचा वेग वाढल्याचे चित्र दिसून आले.
कोल्हापूर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अपडेट्स
> कोल्हापूरात रात्री 12 वाजता डीजे बंद. मंडळाचे कार्यकर्ते आहे तिथेच थांबून.
> सकाळपासून मिरवणुकीत पारंपारिक वाद्य होते. मात्र, संध्याकाळ होताच डीजेचा दणदणाट सुरू झाला.
> गणेश विसर्जन मिरवणुकीत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती डीजेच्या तालावर ठेका धरला.
> सकाळपासून कोल्हापूरात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. या वर्षी मोठ्या प्रमाणात पारंपरिक वाद्यांचा गजर मिरवणूक मार्गावर पाहायला मिळाला.
> प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचे पुढारी समूहाकडून मानाचा श्रीफळ देऊन स्वागत सुद्धा करण्यात आले.
> कोल्हापूरमधील श्री अमर तरुण मंडळ यांच्या मिरवणुकीमध्ये सौ. माधुरीमाराजे छत्रपती यांनी महिलांसोबत हलगीच्या तालावर लेझीम खेळली.
> कोल्हापुरातल्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडे नऊ- दहाच्या सुमारास सुरूवात झाली. कोल्हापुरातील तुकाराम माळी प्रथम मानाच्या गणपतीची पूजा पार पडल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, प्रशासकीय सर्व अधिकारी यांच्यासह महत्वाचे नेते आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
> कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीचे मार्ग कोणते?
पारंपारिक मार्ग : मिरजकर तिकटी-बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड-पापाची तिकटी-गंगावेसमार्गे इराणी खण
समांतर मार्ग : बिंदू चौक-शिवाजी चौक ते पापाची तिकटी, बिंदू चौक ते देवल क्लब
पर्यायी मार्ग : हॉकी स्टेडियम-संभाजीनगर-देवकर पाणंदमार्गे इराणी खण