

Pune Ganesh Visarjan Miravnuk 2025
पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यंदा एक तास लवकर सुरू होऊन देखील दुपारी तीन वाजताच संपेल अशी चिन्हे आहेत. डीजेचा दणदणाट, विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटींचे आकर्षक रथ आणि हिंदी गाण्यांवर थिरकणारी तरुणाई असे चित्र बहुतांश मिरवणुकीत बराच वेळ दिसून आले. दोन मंडळांमधील लांबलेलं अंतर आणि रेंगाळलेल्या मिरवणुका ही परिस्थिती रात्री एक पर्यंत कायम होती. विशेष म्हणजे रात्री उशिरादेखील रस्त्याच्या दुतर्फा गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होती.
गणपती विसर्जन मिरवणुकीत दांडेकर पुलावरील आझाद मित्र मंडळाच्या गणपतीची पहिली मिरवणूक दुपारी दीड वाजता ग्राहकपेठ चौकात आली. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजता सदाशिव पेठेतील अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाच्या शिष्टबद्ध मिरवणुकीने आणि आकर्षक गजरथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्राहकपेठेचा गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक चार वाजता आली. पारंपरिक वाद्य, शिस्तबद्ध मिरवणूक आणि संपूर्ण महिला वादकांचा सहभाग मिरवणुकीत दिसून आला.
रात्री आठनंतर गणेश भक्तांची गर्दी उसळली आणि चालणे अवघड झाल्याची स्थिती निर्माण झाली. नवी पेठेतील शिवांजली मित्र मंडळाची मिरवणूक ८-१५ वाजता आली. ती ग्राहक पेठ चौकात बराच वेळ रेंगाळली. नंतर रात्री १० वाजता लक्ष्मीनगरच्या साई मित्र मंडळ आणि ११ वाजता टिळक रोडवरील एकता मित्र मंडळाच्या मिरवणुकीतील ढोल पथकाने सर्वांना खिळवून ठेवले.
टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीत २०२२ मध्ये १६० मंडळे, २०२३ मध्ये १८३ मंडळे आणि २०२४ मध्ये १७५ मंडळाचा सहभाग राहिला होता. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या संथ मिरवणुकांमुळे रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मिरवणुका सुरू राहण्याची दाट शक्यता आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक किती तास चालते?
2025 -
मिरवणुकीला सुरूवात : सकाळी 9.30 वाजता
मिरवणूक संपण्याची वेळ : दुपारी तीन वाजता (अंदाजे)
2024 - एकूण 28 तास 45 मिनिटे
मिरवणुकीला सुरूवात : सकाळी 10.15 वाजता
मिरवणूक संपली : दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता
2023 – एकूण 30 तास 25 मिनिटे
2022 – एकूण 31 तास
पुणे विसर्जन मिरवणुकीच्या महत्त्वाच्या अपडेट्स
> रात्री 12 वाजता डीजेचा दणदणाट बंद. सकाळी पुन्हा मिरवणुका सुरू होतील.
> पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर नऊ वाजून 23 मिनिटांनी विसर्जन.
> पुण्यात लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलाना अश्रू अनावर. आई वडील आणि पालिका कर्मचारी समजूत काढताना दिसून आले. गणपती देव हा आपला वाटतो, अशा भावना या चिमुकल्यांकडून व्यक्त करण्यात आल्या.
> रात्री देखील मेट्रो आणि मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी. विसर्जन मिरवणुका पाहून गणेश भक्त मेट्रोने घरी जात आहेत.
> कुमठेकर रस्त्यावर मंडळे प्रचंड धीम्या गतीने मार्गक्रमण करत होती. रात्री 12 पर्यंत केवळ 12 मंडळे फडतरे चौकातून मार्गस्थ झाली. शेवटी पोलीस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले आणि सर्वांना पुढे घेऊन जाताना दिस होते. मंडळे डीजे, रथ पुढे घेऊन जात होती.
> श्रीमंत भाऊ रंगारी रात्री 11.05 वाजता आणि अखिल मंडई रात्री 11.55 वा. बेलबाग चौकातून रवाना.
> रात्री साडे बाराच्या सुमारास दोन मंडळातील अंतर कमी करून मिरवणुका मार्गस्थ करण्यासाठी पोलीस यंत्रणा सरसावली. पारंपारिक वाद्य वाजनावर मिरवणुका सुरू होत्या. गावाकडील ढोल लेझीमचा दणदणाट सुरू आहे. मार्केट यार्डचा शारदा गजानन रात्री साडे बारापर्यंत अभिनव चौकापर्यंत आलेला नव्हता.
> रात्री दीडच्या सुमारास अलका टॉकीज चौकात वाद. पोलिसांनी घटनास्थळी. परिस्थिती नियंत्रणात.
> रात्री दोनच्या सुमारास सारस्वत बँक जवळ जय शारदा गजानन मिरवणुकीचे अश्वमेध ढोल ताशा पथकाच्या वादनाने रंगत आणली.
> रात्री दोननंतर टिळक रोडवरील गर्दी ओसरली.