कोल्हापूर : राजकीय वैमनस्यातून भेंडवडे येथे दोन गटात हाणामारी; आठ जखमी

कोल्हापूर : राजकीय वैमनस्यातून भेंडवडे येथे दोन गटात हाणामारी; आठ जखमी
Published on
Updated on

किणी; पुढारी वृत्तसेवा : राजकीय पूर्ववैमनस्यातून भेंडवडे येथे दोन गटात आज (दि.५) तुफान हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील आठजण गंभीर जखमी झाले. यावेळी एक मोपेड पेटविण्यात आली तर एका मोटरसायकलची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्यादी नोंद झाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर भेंडवडे गावात तणावाचे वातावरण आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भेंडवडे येथे ग्रामपंचायत निवडणुकीपासून राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने गट विरुद्ध अमोल निकम व बालाजी निकम गट असा राजकीय संघर्ष सुरू आहे. गुरुवारी (दि.४) रात्री सातच्या सुमारास निकम गटाचे कार्यकर्ते विजय कुंभार यांना उपसरपंच हणमंत पाटील यांनी मोटरसायकलवरून माने यांच्या घरासमोर आणले. व माने यांच्याबद्दल माघारी अपशब्द बोलल्या बाबतचा जाब विचारत मारहाण केली होती. याबाबत गुरूवारी (दि.४) रात्री उशिरा वडगांव पोलीस ठाण्यात माने गटाच्या अभिजीत सर्जेराव माने,संग्राम बाळासो माने, बाळासो दिनकर माने, सुशांत संजय पाटील, रोहन किरण कांबळे,करण माने (सर्व रा.माळवाडी, भेंडवडे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माने गटाच्या कार्यकर्त्यानी निकम यांच्या घरासमोर जाऊन दंगा घातल्याचाही आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर वडगांव पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. दरम्यान या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी निकम गटाचे कार्यकर्ते माने यांच्या घराजवळ गेले. यावेळी मोठा जमाव जमल्याने वाद वाढत गेला. वादाचे पर्यावसन भांडणात झाले. माने व निकम गट एकमेकांना भिडले. यात काठ्या व शस्त्रांचा वापर करत हाणामारी झाली.

दगडफेकही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यात माने गटाचे दशरथ देसाई, आसिफ पठाण, राजवर्धन माने, ऋषीकेश कोळी हे चारजण गंभीर तर नितीन रोकडे व अमोल एडके हे दोघेजण किरकोळ जखमी झाले. तसेच निकम गटाचे संतोष बाळासो निकम (वय ३७) व बालाजी विठ्ठलराव निकम (वय ४४) हे दोघे जखमी झाले. निकम गटाच्या कार्यकर्त्यांची याठिकाणी एक मोपेड जाळण्यात आली तर एका मोटरसायकलवर दगड घालुन तिची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. काही जखमींवर पेठवडगाव येथे तर काहींवर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत रात्री उशिरापर्यंत वडगांव पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती. दरम्यान घटना घडल्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला. वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरव तळेकर फौजफाट्यासह दाखल झाले. संपूर्ण गावात तणावाची परिस्थिती पाहून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. जयसिंगपूरच्या पोलीस उपअधीक्षक डॉ.रोहिणी सोळुंके यांनी भेंडवडे येथे भेट दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news