आपचे बडे नेते काँग्रेसमध्ये, काँग्रेस विरुद्ध आप जुंपण्याची शक्यता | पुढारी

आपचे बडे नेते काँग्रेसमध्ये, काँग्रेस विरुद्ध आप जुंपण्याची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : हरियाणातील आम आदमी पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात काँग्रेसला मिळालेले हे मोठे यश असले तरी यावरून आप नाराज होण्याची शक्यता आहे. हरियाणातील आपचे नेते, माजी मंत्री निर्मल सिंह आणि चित्रा सरवरा यांनी शुक्रवारी (दि.५) काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निर्मल सिंह हे आपचे राष्ट्रीय सहसचिव होते आणि चित्रा सरवरा प्रदेश उपाध्यक्षा होत्या. आप मध्ये जाण्यापूर्वी हे दोन्ही नेते काँग्रेसमध्येच होते.

दरम्यान, इंडिया आघाडीत आधीच दिल्ली आणि पंजाबमधील जागावाटपावरून वाद आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्याला काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या जुन्या वादाला आज झालेल्या पक्षप्रवेशामुळे ठिणगी पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले निर्मल सिंह हे आपपूर्वी काँग्रेसमध्येच होते. त्यांनी युवक काँग्रेसपासून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. ते दोन वेळा मंत्री आणि चार वेळा आमदार होते. निर्मल सिंह दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिले. दुसऱ्या नेत्या चित्रा सरवरा या निर्मल सिंह यांच्या कन्या आहेत. चित्रा यांनीही यापूर्वी काँग्रेस पक्षात काम केले आहे. त्या महिला काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या. सोशल मीडिया विभागात त्यांनी काम केले आहे.

काँग्रेस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाला हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया, प्रदेशाध्यक्ष उदय भान, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा आणि खासदार दीपेंद्र सिंग हुड्डा उपस्थित होते. आपच्या दोन प्रमुख नेत्यांसह अन्य काही पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्व नेत्यांच्या प्रयत्नाने काँग्रेस अधिक मजबूत होईल, असा विश्वास उपस्थित काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

Back to top button