कोल्हापूर: कुरुंदवाडमध्ये विद्यार्थिनींचा ‘कमवा व शिका’ चा संदेश देत ‘दै. पुढारी’ वृत्तपत्राची विक्री

कोल्हापूर: कुरुंदवाडमध्ये विद्यार्थिनींचा ‘कमवा व शिका’ चा संदेश देत ‘दै. पुढारी’ वृत्तपत्राची विक्री

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा : भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज (दि.१४) सकाळी कुरुंदवाड येथील न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्सच्या विद्यार्थिनींनी आपल्या अध्यापकासोबत शहरात फिरून 'कमवा आणि शिका' याचा संदेश देत 'दैनिक पुढारी'चे वृत्तपत्राची विक्री केली. आणि डॉ. कलाम यांनी उभ्या आयुष्यात घेतलेल्या कष्टाचा आदर्श समाजासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला.

डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त विद्यार्थिनींनी कुरुंदवाड येथील ज्येष्ठ वृत्तपत्र एजंट दिगंबर बापूसो कदम यांच्या वृतपत्र विक्रेत्या स्टॉलला भेट देऊन पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. या अनोख्या उपक्रमाचे शहरातून स्वागत झाले.

13 ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. याचे औचित्य साधून येथील न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्सच्या विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिका सुवर्णा यादव, सहाय्यक शिक्षिका शोभा कदम, शिक्षक संजयकुमार ऐनापुरे, तीर्थराज पाटील, सुनीता पासोबा, तेजश्री कनवाडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी रिया हरिदारे, झेबा रोडे, रसिका चव्हाण, वैशाली देसाई, साक्षी पोवार, जेवेरिया सारवान, अक्षरा डांगे, ऋतुजा गावडे यासह अनेक मुलींनी कुरुंदवाड शहरातून घरोघरी जाऊन 'कमवा आणि शिका, कष्ट घ्या, तरच जीवनात यशस्वी व्हाल, हा राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा संदेश देत 'दैनिक पुढारी'चे वृत्तपत्राचे वाटप केले.

यावेळी येथील कुंभार गल्लीत हेमांगी पाटील, सुरेखा बिडकर, मीनाक्षी जिवाजे, वर्षा घारगे, मुग्धा जमदग्नी या महिलांनी 'दैनिक पुढारी'चे वृत्तपत्र खरेदी केले. या मुलींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news